ऊर्जास्त्रोताचा गाभा  असते साधी ' शुभेच्छा'ही ! 

काय वर्णावी ती गोडी 
.............................
ऊर्जास्त्रोताचा गाभा 
असते साधी ' शुभेच्छा'ही !
..........................................
सेवा परमो धर्माचे दुसरे नाव डॉ. प्रकाशभाऊ बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनीताई आमटे. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त असे हे सेवाव्रती. 
महाराष्ट्र, अखंड हिंदुस्तानात हे नाव, खरं तर ब्रँड माहीत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. बंधू डॉ. विकासभाऊ आमटे आणि त्यांची आता चौथी पिढी वंचित, शोषित, आदिवासी यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्य वेचत आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या पायात 'प्रकाशवाटा' पेरत आहेत.
आनंदवन, हेमलकसा येथे कुष्ठरोगी, आदिवासी यांना मानवी प्रवाहात आणण्याचे अशक्यप्राय वाटावे असे महत् सत्कार्य अव्याहतपणे त्यांचे कुटुंब करीत आहे. मनात ठरविले असते तर जगातील सर्व सुखं पायाशी सहजपणे लोळण घेत शरण आली असती. इतके उच्च शिक्षण घेतलेले परंतु, तरीही साधेपणा हा दागिना आणि नम्रपणा हे संस्कार असलेले हे कुटुंब आहे.
आमचे परम भाग्य आहे. काही वर्षापूर्वी कांतीलाल प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला पनवेलला आले होते, भाऊ आणि वहिनी.
मुक्कामाची व्यवस्था हॉटेलवर करत होतो. तर भाऊ म्हणाले की, तुमची काही हरकत नसेल तर तुमच्या घरीच थांबतो ! 
काय वर्णावी ती गोडी...! , अशी ऊर्ध्व अवस्था झाली होती आमची. मनातील मोर आनंदाने थुई थुई नाचू लागला. महागणपतीचा सार्वजनिक उत्सव, घरीही शतकी परंपरेचा गणपती बाप्पा आणि साक्षात मानवी देह धारण केलेले प्रभू रामचंद्रच घरी अवतरले होते. मज जानकीकांत दिसला... असे वर्णन केले तर मुळीच अतिशयोक्ती होणार नाही.
ते क्षण मंतरलेले होते. भाऊ, वाहिनी यांची प्रकट मुलाखत होती. पाऊस धो-धो पडत होता घराबाहेर आणि मनातील पावसाच्या सरी तर थांबायलाच तयार नव्हत्या.
कार्यक्रम झाला. मराठी अभिनेत्री अनुपमा ताकमोघे यांनी मुलाखत घेतली होती.
उत्तम प्रतिसाद लाभला होता कार्यक्रमाला. लहान मुले, महिलांसाठी काही स्पर्धा ठेवल्या होत्या. त्यातील विजेत्या स्पर्धकांना त्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
बिरडं, वरणभात, पापड आणि सुकी भरलेली मिर्ची, तांदळाची गरम गरम भाकरी असा जेवणाचा साधाच बेत होता. केवढ्या तरी आनंदात आणि समाधानीवृत्तीने त्यांनी स्वाद घेतला भोजनाचा. अगदी शबरीची उष्टी बोरं ज्या चवीने प्रभू रामचंद्राने खाल्ली ना, तोच प्रसंग डोळ्यासमोर उभा होता त्यावेळी.
जेवता जेवता आम्ही गप्पा मारत होतो. वहिनी मितभाषीय, मोजक्याच बोलतात एरव्ही. पण त्या दिवशी आमच्या कुटुंबातील एक सदस्य होऊन रमल्या होत्या आमच्यात... अगदी युगांनूयुगाचे ऋणानुबंध असल्यासारखेच...! 
'ताटात येईल ते गोड मानून घ्यायचे. जेवणाची तक्रार करायची नाही' , असे ठरवले आहे, असे भाऊंना जेवणाच्याबद्दल आवडीनिवडी विचारल्यावर त्यांनी एका ताला-सुरात सांगून टाकले. 
बिरडं आणि मिर्ची खूप छान लागते, असे सांगत अर्थात एकूणच जेवण अगदी चविष्ट आणि जिव्हेचा स्वाद वाढविणारा झाला आहे, असे दोघांनीही सांगितले, तेव्हा खऱ्या अर्थाने अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याची साक्ष पटली. आमच्या सौभाग्यवती रूपा धन्य धन्य झाल्या.
रात्री उशिराने भाऊ आणि वहिनी निद्रादेवीच्या अधीन गेले... आम्ही मात्र, त्यांचा लाभलेला सहवास आणि सोबतच्या गप्पा यात रात्रभर रंगलो होतो... जागरण करत. खरंच ते क्षण खास म्हणता येतील...
सकाळी नास्ता झाला. चहापाणी झाले... भाऊ, वहिनी संध्याकाळी मुंबई येथील एका कॉलेजच्या कार्यक्रमाला जाणार होते. मग आम्हाला दुपारपर्यंत आणखी सहवासाची मेजवानी लाभली, अलभ्य लाभच म्हणावं लागेल. 
भाऊ, वहिनी आणि माझी मुलगी श्रावणी, मुलगा शर्वाय, भाची अपूर्वा यांच्याशी गप्पा मारण्यात रमले होते छानपैंकी...! मुलंही अगदी तल्लीन होऊन खेळत होते गोकुळात जणू काही... किती तरी वेळ त्यांचा संवाद सुरू होता. मोबाईलमध्ये त्यांच्यासोबत फोटोही काढणे सुरू होते. आमच्या घरातच हेमलकसा गुलमोहरासारखा फुलला होता. हेमलकसाचे भाग्यविधाते साक्षात इथे अवतरले होते आणि त्यांनी ज्या जंगली प्राण्यांना मानवी संस्कृती शिकवत संस्कार केले, ते प्राणी आमच्या घरातीलच होते, असे म्हणू या हवे तर, विनोदार्थाने... तसेही आम्ही तिघांना लहानपणी गांधीजींची तीन माकडेच म्हणायचो, एकत्र आल्यावर ! 
त्यांनी कुठल्या जन्माचे भाग्य काढले कुणास ठावूक! अशा महापुरुषांची दृष्टी जरी पडली ना, तरी जीवनात खूप मोठे आपोआप बदल होतात. आम्हाला आणि मुलांनाही त्यांचा जो सहवास लाभला, त्यांच्या अखंड ऊर्जास्त्रोताने आम्हाला न्हाऊ घातले. ते क्षण सुवर्णाक्षराने लिहून ठेवले आहेत हृदय पंखावर! 
दुपारी त्यांना सायन, मुंबईला आम्ही सोडायला गेलो होतो. तिथे एका होस्टेलवर त्यांची व्यवस्था केली होती, आयोजकांनी. प्रवासात पुन्हा एकदा गप्पांचा फड रंगला होता. होस्टेलवरून निघताना चहा घेतल्याशिवाय भाऊंनी सोडले नाही. 
तसे घरातून निरोप घेताना, आम्हाला हेमलकसाला येण्याचे आमंत्रण दिले होते. तो सुवर्णयोग मात्र, अद्याप आलेला नाही.
त्यानंतर काही दिवसांनी एक पत्र आले घरी. अलीकडे पत्र अभावानेच येतात, म्हणून जरा उत्सुकता होती. उघडून पाहिले तर स्वतःच्या हस्ताक्षरात मराठीत लिहिलेले ते पत्र... त्यातील एका एका शब्दावरून नजर फिरवत असताना डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते... नुसते वाहत नव्हते तर एकाच वेळी हजार सागरांना भरती यावी, तशा शब्दांतून ममत्वाच्या फेसाळलेल्या लाटा अंगावर येत होत्या...
सुखरूप प्रवास झाला, घरापर्यंत ! खूप बरं वाटलं आपल्याला भेटून. छान कार्यक्रम झाला अशा मोजक्या पण आम्हाला अखंड प्रेम देणाऱ्या त्या ओव्याच होत्या आणि ऋणानुबंधाची विण अधिक घट्ट झाल्याची साक्ष देत होते.
उत्कट प्रेम, आपुलकी, मायेचा ओलावा या शब्दांना काळजाचे शिंपण घालत त्यांनी लिहिले होते ते पत्र. आईने प्रेमाने दिलेल्या भरलेल्या सुक्या मिरच्या जेवताना खातो, तेव्हा तुमची सर्वांची आवर्जून आठवण येते... आईला नमस्कार सांगा. आपल्या सर्वांना अनेक आशीर्वाद ! 
आपला... डॉ. प्रकाश आमटे.
हे वाचून तोंडातून शब्दच फुटले नव्हते किती तरी वेळ... आम्ही सारे जण नि:शब्द झालो होतो. आईची आठवण काढून जेवणारा युगपुरुष आयुष्यात आला... आईसुद्धा किती भाग्यवान ! निमित्त ठरल्या होत्या केवळ मिरच्या... 
आयुष्य जगताना किती जणांना तरी ही समृद्धीची प्रगती पाहुन मिरच्या लागल्या असतील. त्यांची यादी काढली तर एक ग्रंथ होईल. परंतु इथे त्या मिरच्यांनीही वेगळा इतिहास लिहिला आहे, आमच्या आयुष्याचा ! 
मध्यंतरी भाऊ आणि वहिनी ठाण्यात आले होते. विश्वविख्यात मसाला किंग दातार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांची भगिनी आणि माझी मैत्रीण वर्षा बामगुडे हिने आवर्जून मला बोलावून घेतले होते. विशेषतः निमंत्रितांसाठी खास कार्यक्रम होता. त्यात तिने माझी आणि मित्राची खुर्ची राखीव ठेवली होती. कार्यक्रम संपल्यानंतर भाऊंना वेढा पडला होता चाहत्यांचा... आतल्या दालनात. मी दूर उभा होतो. भाऊंची नजर माझ्यावर पडताक्षणी मला कांतीभाऊ या ..! अशी हाक मारली, तसे पुढे उभे असणाऱ्या सैनिकांना सेनापतीने एक साथ पीछे मूडचे आदेश दिल्यासारखेच अर्ध गोलाकार पूर्ण करत एका झटक्यात मागे वळून पाहू लागले... मी आपला स्तब्ध होतो... प्रभू रामचंद्राचे पाय जेव्हा पंचवटीला लागताच ती जशी रोडावली असेल तसे झाले होते माझे...! 
मी जवळ गेलो. नमस्कार केला उभयतांना. तर पहिला प्रश्न आई कशी आहे? वहिनी, मुलं ! सर्वांची विचारपूस केली. माझी आस्थेवाईकपणे चौकशी केली. अनेकांच्या नजरा आता आश्चर्यपूर्वक माझ्याकडेच होत्या. बराच वेळ तिथेही त्यांनी मला दिला... सौभाग्याचे लेणं म्हणतात ते हेच असतं ! 
दोन वर्षापूर्वी भाऊ एका कार्यक्रमानिमित्ताने बँगलोरला गेले होते. संयोजकांपैंकी एकाकडे ते चहापानाला गेले होते. कर्मधर्म संयोगाने त्याच इमारतीमध्ये माझी मेव्हुणी, रश्मीताई राहते. तिचा मला फोन आला.
अरे कांत, आमच्या इमारतीमध्ये चौदाव्या मजल्यावर डॉ. प्रकाशभाऊ आमटे आलेत...
मग जा आणि भेट त्यांना. आशीर्वाद घे त्यांचे, असे पुढचे तिचे काही न ऐकता मी मोफत सल्ला फुकटात दिला तिला.
तर ती म्हणाली, 'अरे बाबा, मला हे विचारायचे आहे की, आपल्या घरी कॉफी प्यायला येतील का ते, मी बोलाविले तर...? ' 
धर्म संकटात टाकणारा प्रश्न... आपली माणसं कधी कधी कशी अडचणीत टाकतात त्याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.
हो, येतील ! मी पण अगदी कॉन्फिडन्सने तिला सांगून टाकले.... एखाद्या कुरमोड्या ज्योतिष्यासारखे. 
तसा तिचा माझ्या शब्दावर खूप विश्वास, अढळ श्रध्दा आहे. ती ताडताड लिप्टने गेली तिकडे. नमस्कार, चमत्कार केला आणि बाजी प्रभूंसारखी खिंड लढवत एका दमात भाऊंना माझा संदर्भ देत कॉफीचे निमंत्रण दिले. भाऊंनीही तिचे लाड पुरविले आणि घरी गेले देखील. ती ही, मग त्या व्रतस्थ वटवृक्षाच्या सावलीत काही वेळ शांतरसाने भरून पावली. केवढं हे निर्व्याज प्रेम! 
काल, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्याची थोडक्यात माहिती देणारी पोस्ट शेअर केली होती. ती वाचून उत्तम कार्य असल्याच्या शुभेच्छा आणि शाबासकी देणारे आशीर्वादाचे भाऊंचे हात पुन्हा एकदा पाठीवर त्यांनी ठेवले... ते डोळ्यांत साठवत असताना, परवा देशात सगळीकडे नऊ मिनिटांसाठीचा विद्युत पुरवठा खंडित केला होता ना, ती सारी वीज भाऊंनी दिलेल्या आशीर्वादाने माझ्या अंगातून संचारत होती किती तरी वेळ... कदाचित नवा इतिहास घडविण्यासाठी ते ऊर्जास्त्रोत माझे जीवन व्यापून राहील.
- कांतीलाल कडू


Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image