राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ निमित्त जिल्हा सांख्यिकी अधिकारी,सविता पवार यांची मुलाखत

*राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ निमित्त जिल्हा सांख्यिकी अधिकारी,सविता पवार यांची मुलाखत*


 


प्रश्न :राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ याची सुरूवात केव्हापासून झाली व याबाबतची पार्श्वभूमी काय आहे?


 


उत्तर :ख्यातनाम संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे संख्याशास्त्रात असणा-या योगदानामुळे त्यांचा जन्मदिवसहा29 जून 2007 यावर्षापासून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू लोकांमध्ये संख्याशास्त्राचे महत्त्व, रोजच्या जीवनातील संख्याशास्त्राचा वापर तसेच नियोजन व विकास कामे यामधील संख्याशास्त्राचा वापर याबद्दल जनजागृती करणे हा आहे. यावर्षीचा राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणजे 29 जून 2020 हा 14 वा ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ आहे.


29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करताना सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालय नवी दिल्ली हे दरवर्षी एक विषय ठरवून देते जसे की, ‘शेती आणि शेती कल्याण’, ‘प्रशासकीय सांख्यिकी’, ‘सामाजिक विकास’, ‘कार्यालयीन सांख्यिकीची गुणवत्ता हमी’ इत्यादी. याप्रमाणे दरवर्षी एक विषय ठरवून देऊन पुर्ण देशभरात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा केला जातो.हा दिवस साजरा करून थोर संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबीस यांनी आर्थिकयोजनाआणिसांख्यिकीविकासयाक्षेत्रात केलेले काम व त्याचा जनसामान्यांना झालेला फायदा याचा गौरव केला जातो.


 


प्रश्न : प्रशांतचंद्र महालनोबीस यांना थोर संख्याशास्त्रज्ञ का म्हटले जाते?


 


उत्तर :संख्याशास्त्रज्ञ महालनोबीस यांचा जन्म 29 जून 1893 मध्ये कलकत्ता येथे झाला. त्यांचे सुरवातीचे शिक्षण ब्राह्मो बॉईज स्कूल कलकत्ता येथे झाले. महालनोबीस यांनी पदवीचे शिक्षण हे भौतिकशास्त्र या विषयात 1912 साली पूर्ण करून ते 1913 साली लंडन येथील विद्यापीठात दाखल झाले. तेथे त्यांना बायोमेट्रिका या जर्नलने खूप प्रभावित केले, त्यामुळेच त्यांची संख्या शास्त्र या विषयातआवड निर्माण झाली. भारतात परतल्या वर श्री. महालनोबीसयांनी ‘ भारतीय सांख्यिकी संस्थान’ या विश्वविद्यालयाची 1931 मध्ये स्थापना केली, नंतर या विश्वविद्यालयाला 1959 मध्ये ‘राष्ट्रीय महत्त्वाचे संस्थान’ म्हणून घोषीत करण्यातआले. महालनोबीस यांचेआर्थिक योजनाआणि सांख्यिकी विकास या क्षेत्रात उल्लेखनिय योगदान आहे. दुस-या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार करताना महालनोबीस यांनी सांख्यिकीचा वापर देशहितासाठी कसा केला जातो हे पटवून दिले, त्यामुळेच दुसरी पंचवार्षिक योजना ही ‘महालनोबीस मॉडेल’ म्हणून ओळखली जाते. ‘महालनोबीस अंतर’ हे त्यांच्याद्वारे सुचवलेले महत्त्वाचे मापन आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महालनोबीस हे नवगठित मंत्रिमंडळाचे सांख्यिकी सल्लागार होते, तसेच त्यांनी सरकारचा ‘बेरोजगारी संपवणे’ हा मुख्य हेतू साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या योजना बनविल्या. महालनोबीस यांनी पहिले भारतीय संख्याशास्त्र जर्नल ‘ संख्या’ याचा शोध लावला.


श्री. महालनोबीस यांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे ‘नमुना सर्वेक्षण’ हे आहे, ज्याच्या आधारावर आजही मोठमोठ्या योजना बनविल्या जातात. त्यांचे सुरवातीचे सर्वेक्षण हे 1937 ते 1944 या कालावधीत झाले. ज्यामध्ये ग्राहकांचा खर्च, चहा पिण्याची सवय, लोकांचे अभिप्राय, वनस्पतींचे आजार यासारख्या अनेक विषयांवर सर्वेक्षण केले. त्यानंतर नमुना सर्वेक्षणाचा वापर उत्तर बंगालमध्ये नद्यामुळे पुराचा धोका कमी करण्यासाठी केला गेला. तेथे नद्यामुळे पुराचा धोका नेहमी असे, इंजिनिअर्सनी महालनोबीस यांना या समस्येविषयी सल्ला मागितला, त्यासाठी महालनोबीस यांनी आधीच्या पन्नास वर्षाचे पर्जन्यमान व पुराची स्थिती याचा अभ्यास केला व त्यावरून पाण्याचा निचरा योग्यप्रकारे कसा करता येईल, अशी कमी खर्चिक गटार बांधण्याची शिफारस केली. तसेच नद्याच्या पुराविषयी धरणे बांधणे, कालवे काढणे इत्यादी उपाय सुचवून महालनोबीस यांनी पुरनियंत्रण व त्या प्रदेशाचा आर्थिक विकास, वीज निर्मिती व पिक सुधारणा इत्यादी लाभ करवून दिले. या सगळ्या कामगिरीमुळेच ते थोर संख्याशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले.


या थोर संख्याशास्त्रज्ञाचा मृत्यू हा दिनांक 28 जून 1972 रोजी म्हणजेच त्यांच्या 79 व्या जन्मदिवसाच्या एक दिवस आधी झाला. या वयातही महालनोबीस हे अत्यंत कार्यक्षम होते, तसेच ते संशोधनाचे कामही करायचे, ते भारतीय सांख्यिकी संस्थानचे सचिव तथा संचालक होते आणि ते भारत सरकारचे सांख्यिकी सल्लागारही होते.


श्री. महालनोबीस यांच्या संख्याशास्त्रातील महत्त्वाच्या योगदानामुळेच ते ‘थोर संख्याशास्त्रज्ञ’, तसेच ‘Indian Father of Statistics’ म्हणून ओळखले जातात.


 


प्रश्न : संख्याशास्त्र म्हणजे काय? व त्याचा वापर कुठे होतो?


 


उत्तर : हल्ली ब-याच कंपन्या आपली उत्पादने, सेवा, ग्राहकांचा प्रतिसाद, मालाचा खप इत्यादी गोष्टी जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण करतात, यावेळी मिळतो तो खूप मोठ्या प्रमाणातील डेटा. पण नेमके डेटा म्हणजे काय? डेटा म्हणजे केवळ आकडे नाहीत तर असे आकडे ज्यात विशिष्टप्रकारची माहिती एकत्रित असते. या मिळालेल्या माहितीचे योग्य प्रकारे विश्लेषण करण्याची गरज असते व अशावेळी उपयोगास येते ते म्हणजे संख्याशास्त्र. संख्याशास्त्र म्हणजे संख्यात्मक माहितीचे एकत्रिकरण, सादरीकरण, विश्लेषण आणि अर्थनिर्वचन म्हणजेच निर्णय घेणे याचे शास्त्र म्हणजे संख्याशास्त्र होय.


संख्याशास्त्राने मानवाचे आयुष्य पूर्णपणे व्यापून टाकले आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, हवामानाचे अंदाज, आप्तकालीन तयारी, आर्थिक नियोजन, वाहतूक सुविधा, सरकारी योजना आणि लोकसंख्या या प्रत्येक क्षेत्रात संख्याशास्त्राचा वापर प्रभाविपणे केला जातो. आपल्या दैंनदिन जीवनात आपण कळत नकळत संख्याशास्त्राचा वापर अनेक ठिकाणी करत असतो, पण हे आपल्या लक्षातच येत नाही. अगदी भात शिजला आहे का? किंवा भातात मीठ आहे का? हे पाहण्यासाठी आपण भाताचा एक शीत उचलतो व पूर्ण भाताबद्दल अंदाज व्यक्त करतो, येथे आपण संख्याशास्त्रातील नमुना सर्वेक्षण ही पध्दत वापरतो. तसेच आपण घरातून बाहेर पडताना पाऊस येईल किंवा नाही येणार याबद्दल अंदाज व्यक्त करातो, क्रिकेट खेळामध्ये अर्धा खेळ झाल्यानंतर झालेल्या धावसंख्यावरून कोणता संघ विजयी होईल किंवा कोणता संघ पराजीत होईल याबद्दल शक्यता व्यक्त करतो, अश्या शक्यताचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे संख्याशास्त्र होय.


 


प्रश्न :जिल्हा पातळीवर आपल्या कार्यालयाद्वारे कोणत्या प्रकारची कामे केली जातात?


 


उत्तर : अर्थ व सांख्यिकी संचालनालय ही राज्य शासनाची प्रमुख सांख्यिकीय संस्था म्हणून कार्यरत आहे. संचालनालयाचे जिल्ह्यांच्या ठिकाणी असलेले जिल्हा सांख्यिकी कार्यालय (District Statistical Office) हे जिल्ह्यातील सांख्यिकी माहिती गोळा करण्याचे महत्त्वाचे काम करते. या कार्यालया मार्फत जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेतील विविध सामाजिक व आर्थिक क्षेत्रांच्या स्थितीबाबतची एकत्रित माहिती असणारे एकमेव प्रकाशन ‘जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन’ हे दरवर्षी प्रकाशित केले जाते. या प्रकाशनाचा वापर विविध कार्यालये नियोजनाकरिता आकडेवारी गोळा करण्यासाठी, तसेच संशोधक, विद्यार्थी, विविध संघटनादेखील वापर करतात. जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत वेगवेगळ्या गणना केल्या जातात. राज्य शासकिय तथा जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचा-यांची नोंदणी करण्याकरीता ‘कर्मचारी गणना’, ‘आर्थिक गणना’ याप्रकारच्या गणना केल्या जातात. तसेच जनगणना, पशुगणना या विविध प्रकारच्या गणनांची अद्यावत माहिती या कार्यालयाद्वारे पुरवली जाते. या कार्यालयाकडून ‘रोजगार बेरोजगार पाहणी’, ‘वार्षिक उद्योग पाहणी’, ‘मूल्यमापन पाहणी’, ‘नमुना नोंदनी पाहणी’ ही कामे केली जातात. तसेच तालुका निवडक निर्देशांक, राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही, साप्ताहिक किरकोळ किंमती, पशु व पशु उत्पादनाच्या सरासरी घाऊक किंमती, मान्यताप्राप्त पशुवध गृहे व त्यात कत्तल झालेल्या जनावरांची संख्या, रिक्षा व टॅक्सी यांचे प्रचलित दर, चित्रपट गृहाचे तिकिट, फळे, भाजीपाला व फुले इत्यादी उत्पादनांच्या किंमती गोळा करणे यासारखी महत्त्वाची कामे जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत करण्यात येतात.


 


प्रश्न : सर्वसाधारणपणे नागरीकांमध्ये आजही सांख्यिकी विषयक जागृती दिसून येते का? नसल्यास काय करावे ?


 


उत्तर : आजही नागरीकांमध्ये सांख्यिकी विषयक जागृती दिसून येत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे संख्याशास्त्र या विषयाच्या वापराबद्दल , संख्याशास्त्रामुळे मिळणा-या सेवासंधीबद्दलच्या माहितीचा त्याच्यात असणारा अभाव हे आहे. नागरीकांना संख्याशास्त्राचा रोजच्या जीवनात होणारा वापर, तसेच राष्ट्रीय स्तरावर होणारा वापर याबाद्दल जागृत करणे गरजेचे आहे.


संख्याशास्त्र या विषयाबाबत सर्वसामान्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. काहीना असे वाटते की संख्याशास्त्र म्हणजे केवळ अंदाज बांधणे किंवा शक्यता व्यक्त करणे होय. पण हे अंदाज बांधताना किंवा शक्यता वर्तवण्यासाठी पुरेशी माहिती गोळा केली जाते, त्याचा अभ्यास केला जातो व त्यानंतर असे अंदाज वर्तविले जातात. संख्याशास्त्राचा आवश्यकतेनुसार अभ्यास केला जातो, त्यामुळे संबधित व्यक्तीला संख्याशास्त्राचे कितपत ज्ञान आहे व अजून त्याला किती ज्ञान मिळवले पाहिजे जेणेकरून संख्याशास्त्राबद्दल असणारे त्याचे गैरसमज दूर होतील हे त्या व्यक्तीने जाणले पाहिजे. 


आजही युवकांमध्ये सांख्यिकी विषयक उदासिनता दिसून येते, परंतु संख्याशास्त्र या क्षेत्रात करिअर करणा-या विद्यार्थ्यांना विश्लेषक, संगणक अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, संशोधन अधिकारी म्हणून काम करण्याची संधी आहे हे युवकांना माहितच नाही. संख्याशास्त्र ही करिअर मिळवून देणारी एक चांगली विज्ञानशाखा आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालय या विभागात सांख्यिकी अधिकारी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, संशोधन सहायक तसेच सांख्यिकी सहायक म्हणून नोकरीच्या संधी आहेत. त्याचप्रमाणे भारतीय सांख्यिकी सेवा, स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्येही संख्याशास्त्राशी संबधीत नोकरीच्या संधी आहेत. पदवीत्तुर पदवी संख्याशास्त्र, एम.स्टॅट हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संशोधनाची किंवा अध्यापनाची संधी मिळू शकते. तसेच बायोस्टॅटिस्टिशियन , डेटा ॲनॅलिस्ट, इकॉनॉमेट्रिशियन, रिसर्च ॲनॅलिस्ट, स्टॅटिस्टिशियन अशा नोकरीच्या संधी मिळू शकतात.


 


राहुल भालेराव


जिल्हा माहिती अधिकारी 


पालघर.