*मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड*
*योजनेला प्रचंड प्रतिसाद*
नवी मुंबई, दि. 16 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्ग कोंकण विभागात फळबाग योजनेला प्रंचड प्रतिसाद मिळत आहे असे विभागीय कृषी सहसंचालक यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कोविड -१९ या महामारीमुळे देशात व राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुसंख्य मजूर लोकसंख्या ग्रामीण भागात मूळ गावी स्थलांतरित झाल्यामुळे त्यांना त्यांचे गावात रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेचा मोलाचा हातभार लागत आहे. या योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमासाठी लाभार्थीचे नाव असलेले मग्रारोहयो योजनेचे जॉब कार्ड, शेतीचा 7/12, 8-अ, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत आदी कागदपत्रांची आवश्यकता असते. या योजनेमध्ये आंबा, काजू, पेरु, लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, बांबू, करंज, जट्रोपा, साग, गिरिपुष्प, सोनचाफा, कडीपत्ता, कडुलिंब, शिंदी रोपे, शेवगा व हादगा (औषधी वनस्पती - अर्जुन, आसान, अशोका, बेहडा, बेल, हिरडा, टेवू, डिकेमाली, रत्त चंदन, रिठा, लोध्रा, आईरन, शिवन, गुग्गुळ, वावडिंग, बिब्बा रोपे ) आदी कलम व रोपे यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा कालावधी माहे एप्रिल ते नोव्हेंबर असुन यामध्ये जमीन तयार करणे, खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, काटेरी कुंपण करणे, आंतरमशागत करून खत देणे तसेच पिक संरक्षण करून पाणी देणे या बाबींकरीता अनुदान देय आहे.
अनुसूचित जाती, अनुसुचीत जमाती, दारीद्र रेषेखालील लाभार्थी, भु-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्क मान्य असलेले) अधिनियम, २००६ खालील लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजना, २००८ यामध्ये व्याख्या केलेल्या लहान व सीमांत भूधारक शेतकरी यांना शर्तीच्या अधिन राहून प्राधान्य देण्यात येईल.
*फळबाग लागवडीसाठी प्रती हेक्टर अनुदान*
मग्रारोहयो फळबाग लागवड योजने अंतर्गत एकूण ३ वर्षांसाठी पुढील प्रमाणे प्रती हेक्टर अनुदान लागू आहे. आंबा कलमे लागवड (हेक्टरी १०० झाडे) - रु.१ लाख ६१ हजार २६०, काजू कलमे लागवड (हेक्टरी २०० झाडे ) - रु.१ लाख १४हजार ७२५. नारळ रोपे बाणावली लागवड (हेक्टरी १५० झाडे) -रु.१ लाख ३४ हजार ४९२, नारळ रोपे टी/डी लागवड ( हेक्टरी १५० झाडे ) रु.१ लाख ४४ हजार ७६२, चिकू कलमे लागवड (हेक्टरी १०० झाडे ) - रु.१ लाख ५८ हजार ८९०, जांभूळ रोपे लागवड (हेक्टरी १०० झाडे ) रु.९६ हजार ५७०.
सन २०१९-२० मध्ये कोकण विभागात मग्रारोहयो फळबाग लागवड योजने अंतर्गत १८ हजार ३०० शेतकरी लाभार्थी होते. लागवड क्षेत्र १० हजार ३३१ हेक्टर असून, लागवड केलेल्या कलमे रोपांची संख्या १८ लाख ३७ हजार ९३६ आहे. तसेच सदर योजनेंतर्गत सुमारे रु.३० कोटी ९९ लाख अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
*योजनेत सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म ची लिंक उपलब्ध*
या योजनेअंतर्गत सन २०२०-२१ करिता आतापर्यंत २० हजार ९९४ शेतकरी लाभार्थींकडून ११५०० हेक्टर क्षेत्रासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. सद्यस्थितीत कोंकण कृषी विभागाअंतर्गत ५८ लाख ४६ हजार १३५ इतकी कलमे रोपे उपलब्ध करण्यात आली आहेत. ज्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचे आहे त्यांना सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म ची लिंक तयार करण्यात आली असून शेतकऱ्यांनी त्यावर नाव नोंदणी केल्यास त्यांना सहभागी करून घेण्यासाठी २४ तासात कृषी विभागामार्फत संपर्क साधला जाईल. आता पर्यंत या माध्यमातून १ हजार २०० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत .
कोंकण विभागातील बहुसंख्य शेतकरी बंधूनी आपले कार्यक्षेत्रातील कृषी सहायक , कृषी पर्यवेक्षक , मंडळ कृषी अधिकारी , तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळण्याकरीता योजनेत मोठ्या प्रमाणात उस्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग यांनी केले आहे .