नमुंमपा अधिकारी, कर्मचारी विविध उपक्रमांतून करणार मराठी भाषेचा जागर

 

नमुंमपा अधिकारी, कर्मचारी विविध उपक्रमांतून करणार मराठी भाषेचा जागर

 


      मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दि. 22 डिसेंबर 2021 रोजीच्या परिपत्रकानुसार दि. 14 ते 28 जानेवारी 2022 या कालावधीत राज्यभरात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही मराठी भाषेचा प्रचार - प्रसार व्हावा तसेच कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर व्हावा यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांचे मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

      यामध्ये दि. 24 जानेवारी रोजी 'गझलरंग' हा मराठी गझलविषयक उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये सुप्रसिद्ध गझलकार श्री अप्पा ठाकूर, श्री रवी वाडकर व महापालिकेचे वैदयकिय अधिकारी गझलकार डॉ. कैलास गायकवाड गझलांचे सादरीकरण करणार आहेत.

       दि. 25 जानेवारी रोजी महानगरपालिकेचे सहा. विधी अधिकारी श्री. अभय जाधव हे 'कायदा, साहित्य आणि                          कार्यालयीन कामकाजात मराठीचा वापर' या विषयावर अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधणार आहेत.

      मराठी वाचनसंस्कृती वृध्दींगत‍ व्हावी व उत्तम मराठी साहित्य इतरांपर्यंत पोहचावे या दृष्टीने दि. 27 जानेवारी रोजी महापालिका अधिकारी - कर्मचारी यांच्यामार्फत त्यांच्या आवडत्या कवींच्या कवितांचे सादरीकरण - 'काव्यांजली' उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आले असून दि. 28 जानेवारी रोजी महापालिका अधिकारी - कर्मचारी आपल्या आवडत्या पुस्तकातील वेचक उता-याचे / भागाचे अभिवाचन करणार आहेत.

      हे सर्व कार्यक्रम कोव्हीड नियमावलीचे काटेकोर पालन करुन नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात साय. 4 वाजता मर्यादित उपस्थितीत संपन्न होणार असून महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवरुन फेसबुक लाईव्ह प्रक्षेपित होणार आहेत.

      त्याचप्रमाणे विविध पर्यावरणपूरक उपक्रम, प्रकल्प यामुळे नवी मुंबई शहराची ओळख 'इको सिटी' म्हणूनही दृढ होत असून महाराष्ट्र शासनाच्या 'माझी वसुंधरा अभियान' मध्ये मागील वर्षी नवी मुंबई शहरास राज्यात व्दितीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे.

      यावर्षीच्या अभियानामध्ये 'निश्चय केला - नंबर पहिला' हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून विविध पर्यावरणशील उपक्रम राबविले जात आहेत. असाच एक अभिनव उपक्रम 'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून राबविला जात असून नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांचेकरिता 'सुंदर हस्ताक्षर लेखन' या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये, सहभागाकरिता महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी 'माझी वसुंधरा अभियान शपथ' स्वहस्ताक्षरात ए फोर आकाराच्या को-या कागदावर / फुलस्केपवर लिहून 25 जानेवारीपर्यंत सादर करावयाचे आहे.

      मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून या माध्यमातून मराठी भाषेचा जागर केला जात आहे.  


Popular posts
विस्तारित बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या दोन टप्प्यांतून ११केव्ही विद्युत वाहिनी सुरू होत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
Image
पोलीस व आदिवासीमध्ये पेटली संघर्षाची ठिणगी ; शेवठी, बेकायदेशीर दगडखाणी मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश..
Image
नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Image
पनवेलकरांच्या भीषण पाणीटंचाईवर आमदार विक्रांत दादा पाटील यांनी वेधले सरकारचे लक्ष.....!!
Image
२०३० पर्यंत ५०० दशलक्ष लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता - जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
Image