"साईनगर-कर्नाळा स्पोर्ट्स रस्ता तातडीने दुरुस्त करा"-विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांचे निर्देश
पनवेल : साईनगर , बावन बंगला परिसरातील नागरिकांना पनवेल बाहेर जाण्यासाठी कर्नाळा स्पोर्ट्स मार्गे रस्ता आहे.सदर रस्त्यावरून दररोज कामानिमित्त, सकाळी मॉर्निंग वॉक साठी, तसेच विविध कामासाठी हजारो नागरिक आणि शेकडो गाड्यांची वर्दळ या रस्त्यावरून असते. परंतु पावसात या रस्त्यावर मोठे खड्डे पडले. तसेच त्या रस्त्याच्या लगत जाणाऱ्या सिवरेज लाईन मधील घाण पाणी या खड्ड्यांमध्ये साचत होते अशी तक्रार त्या परिसरातील नागरिकांनी विरोधी पक्षनेते .प्रितम म्हात्रे यांच्याकडे केली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते .प्रितम म्हात्रे यांनी त्वरित सदर रस्त्याचा पाणी दौरा केला. त्यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक नगरसेविका सारिका भगत उपस्थित होत्या. तेथे राहणाऱ्या सुशील ब्लॉसम , अपटाऊन अवेन्यू , सुशील रुक्मिणी या इमारतीमधील रहिवासीयांनी त्यांची व्यथा पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर.प्रितम म्हात्रे यांच्यासमोर मांडली. यावेळी सर्वप्रथम रस्त्यावरील खड्डे भरून नागरिकांना चालण्यासाठी रस्ता सुस्थितीत करून द्यावा अशी सूचना विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली. त्याबरोबरच चोकअप सीवरेज लाईन मधील रस्त्यावर येणारे सांडपाणी चोकअप काढून यापुढे रस्त्यावर येणार नाही यासाठी योग्य ते नियोजन करण्याचे सांगितले.