19 वर्षीय तरुणीचा अपघात करून पळून जाणाऱ्या ट्रकचालकाला अटक

 19 वर्षीय तरुणीचा अपघात करून पळून जाणाऱ्या ट्रकचालकाला अटक


नवीन पनवेल (मयूर तांबडे ) (पत्रकार) : मुंबई पुणे हायवे वाहिनीवर कोन येथे ट्रकने मोटरसायकलला धडक देऊन 19 वर्षीय आयरीन सुसान जोसेफ (राहणार इंडियाबुल सोसायटी कोन) या तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेले. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मोटर ट्रक क्रमांक MH 06 -AQ- 8224 आणि MH 46 - BF – 8108 असून संजय रामचंद्र जाधव (वय 44, व्यवसाय-चालक, साठेनगरघाटकोपर), बालकुशीन जयराम कुमार (25 वर्ष व्यवसाय-चालक, सॉल्ट पॅन्ट रोडवडाळा) अशी आरोपिची नावे आहेत.

        गोवर्धन टी गोपी (वय 22) हा आयरीन सुसान जोसेफ असे दोघे मोटरसायकल एम एच 43 एई 6995 घेऊन कोन गावच्या दिशेने जात होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या कंटेनर ट्रक चालकाने त्यांच्या मोटरसायकलला ठोकर मारली. यात आयरीनचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही कंटेनर ट्रक पळून गेले होते. या गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पनवेल तालुका पोलिसांसमोर होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे यांच्या पथकाने तपास करण्यास सुरुवात केली. पथकाने घटनास्थळी भेट देऊन आसपासचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन मोठे कंटेनर ट्रेलर यांनी मोटर सायकलला ठोकर मारून पळून गेल्याचे दिसून आले. दोन्ही कंटेनर ट्रेलरवर काही सांकेतिक निशाणी असल्याचे दिसून आल्याने अपघात घटनास्थळापासून व अपघात वेळेपासून ट्रक ज्या मार्गाने निघून गेले त्या मार्गिकेवरील एकूण 17 ठिकाणाचे सी.सी.टी.वी फुटेज चेक केले असता एक ट्रक शेडुंग टोल नाक्याच्या दिशेने व दुसरा ट्रक एक्सप्रेस हायवेवरून पुण्याच्या दिशेने जात असल्याचे दिसले. सदर मार्गातील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करून व वेळेचे गणित जुळवुन कंटेनर वरील सांकेतिक निशाणीचा अंदाज बांधून दोन्ही ट्रकचे क्रमांक व मूळ मालकाचे नाव निष्पन्न केले. तदनंतर दोन्ही ट्रेलर चालकांना ताब्यात घेतले असता त्यांनी चौकशीअंती गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. 

           हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कोणताही दुवा नसताना फक्त सीसीटीव्हीच्या आधारे वेळेचे गणित जुळून अतिशय कौशल्याने सदरचा गुन्हा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि संजय गळवे व डीबी पथकाने अहोरात्र मेहनत घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे. अधिक तपास सपोनि संजय गळवे करीत आहेत.


--

मयूर तांबडे  (पत्रकार)