पलक बागडे ने जिंकले मिस शायनिंग स्टार 2022 चे टायटल-आग्रा येथे झालेल्या फॅशन विक मध्ये केले दमदार प्रदर्शन

पलक बागडे ने जिंकले मिस शायनिंग स्टार 2022 चे टायटल-आग्रा येथे झालेल्या फॅशन विक मध्ये केले दमदार प्रदर्शन


पनवेल/ प्रतिनिधी-लाईफस्टाईल पेजंट च्या माध्यमातून आयोजित केलेल्या फॅशन विक स्पर्धेमध्ये नुकतेच पनवेलच्या पलक आनंद बागडे हिने दैदिप्यमान यश मिळविले आहे. देशभरातून आलेल्या 40 सौंदर्यवतींच्यात पलक बागडे हिने आपली छाप सोडत मिस शायनिंग स्टार हे टायटल पटकावले आहे.मॉडेलिंग, स्पोर्ट्स आणि अकॅडमिक्स अशा निरनिराळ्या क्षेत्रामध्ये लिलया यश संपादन करणाऱ्या पलक बागडे हिच्यावर कौतुकसुमनांचा वर्षाव होत आहे.

        लाईफस्टाईल पेजंट द्वारा आयोजित या फॅशन वीक मध्ये पलकला मिळालेल्या प्रशस्तीपत्रकामुळे प्रोफेशनल मॉडेल म्हणून तिला मान्यता मिळाली आहे. तसेच विविध सौंदर्यस्पर्धांच्यातून तिला जज म्हणून देखील मूल्यांकन करता येणार आहे. डी पी एस मध्ये बारावी विज्ञान शाखेत सध्या पलक शिकत आहे. डॉक्टर बनण्याचे ध्येय्य पलक ने समोर ठेवलेले असून त्यातही दंतचिकित्सा हे स्पेशलायझेशन करण्याची तिची इच्छा आहे.

          न्यू होरायझन स्कूल मधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पलक बागडे हिने डीपीएस मध्ये प्रवेश घेतला. तिची आई मीनल बागडे या फॅशन डिझायनर असल्यामुळे मॉडेलिंग चे बाळकडू तिला घरातच मिळाले. पलकचे वडील आनंद बागडे हे सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आहेत. यापूर्वी स्थानिक सौंदर्य स्पर्धांच्यातून तिने यश संपादन केले आहे. पुणे येथे यु एस पोलो यांच्या वतीने आयोजित फॅशन विकमध्ये देखील तिने घवघवीत यश प्राप्त केले आहे. आग्रा येथील फॅशन विक हा एक स्पर्धाच नव्हे तर परिपूर्ण मॉडेल होण्याच्या प्रवासाचे अत्यंत उपयुक्त प्रशिक्षण होते असे तिचे म्हणणे आहे.

         बारावीची परीक्षा आणि यापुढील सौंदर्य स्पर्धांसाठीचे नियोजन ही तारेवरची कसरत असली तरी देखील हा समन्वय साधण्यासाठी माझ्या कुटुंबीयांचे पाठबळ मला अत्यंत उपयोगी ठरते अशी प्रतिक्रिया तिने दिली. मॉडेलिंग क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रात देखील पलक ने यश संपादन केले आहे. बुद्धिबळात तिने राज्य पातळीवर यश संपादन केलेले असून कराटेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील ठसा उमटविला आहे. याशिवाय बेसबॉल, टेबल टेनिस स्विमिंग या खेळांच्यात तिने जिल्हा पातळीवर प्राविण्य मिळविले आहे. शिवाय कोरियन आणि फ्रेंच भाषांवर देखील तिने प्रभुत्व प्राप्त केले आहे.

          मल्टी टॅलेंटेड पलक हिला भविष्यामध्ये पॅरिस फॅशन विक आणि न्यूयॉर्क फॅशन विक यामध्ये सहभागी होऊन यश संपादन करायचे आहे. लाईफस्टाईल पेजंटच्या मिस टीन 2022 या स्पर्धेची प्राथमिक फेरी अंधेरी येथे संपन्न झाली होती. प्राथमिक फेरीमध्ये यश संपादन करणाऱ्या 40  सौंदर्यवतींना अंतिम फेरीसाठी आग्रा येथील फॅशन विक मध्ये पाचारण करण्यात आले होते. इंट्रोडक्शन राऊंड, टॅलेंट राऊंड, आणि वॉक राऊंड झाल्यानंतर सौंदर्यवतींना टायटल प्रदान करण्यात आली. तत्पूर्वी सौंदर्यवतींना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने वर्कशॉप चे आयोजन देखील करण्यात आले होते. अत्यंत अनुभव संपन्न अशा वर्कशॉपच्या माध्यमातून एक प्रथितयश मॉडेल म्हणून मान्यता मिळाल्यामुळे मी प्रचंड समाधानी असल्याची प्रतिक्रिया देखील पलकने आमच्या प्रतिनिधीकडे बोलून दाखवली.

चौकट

आग्रा येथे झालेल्या फॅशन वीक साठी सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा मिसेस इंडिया श्वेता सिंग चौधरी, स्माईल स्पेशलिस्ट सागर अंबीचंदानी, फॅशन डिझायनर हर्ष खुल्लर, मॉडेलिंग क्षेत्रातले तज्ञ अंकित नागपाल यांनी परीक्षण केले तसेच सौंदर्यवतींना मार्गदर्शन देखील केले.