रोहा तालुक्यातील मौजे पांगळोली येथील पशुपालकांसाठी स्थानिक प्रशासन आणि पशूसंवर्धन विभागाने दाखविली कार्यतत्परता

 

रोहा तालुक्यातील मौजे पांगळोली येथील पशुपालकांसाठी स्थानिक प्रशासन आणि पशूसंवर्धन विभागाने दाखविली कार्यतत्परता


अलिबाग, दि.19 (जिमाका):- रोहा तालुक्यातील मौजे पांगळोली येथील पशुपालकांनी पशूसंवर्धन विभाग, रोहा यांच्याशी दि.17 जुलै रोजी संपर्क साधून गावातील पशू मृत पावल्याचे कळविले होते. ही माहिती मिळताच रोहा पशूसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी त्वरित दाखल झाले होते. प्रथमदर्शी घटनास्थळी 03 पशूंचे मृतदेह निदर्शनास आले. मात्र संध्याकाळची वेळ झालेली असल्याने व पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याकारणास्तव या मृत पशूंचे शवविच्छेदन दि.18 जुलै रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पशूंच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावरच लक्षात येईल, असे तालुका पशू धन विकास अधिकारी डॉ.अक्षय सांगळे यांनी स्पष्ट केले होते.

     या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या तातडीच्या निर्देशानुसार आज दि.19 जुलै रोजी प्रांताधिकारी विट्ठल इनामदार, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन डॉ.रत्नाकर काळे, जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.श्याम कदम, रोहा तहसिलदार कविता जाधव, तालुका पशू धन विकास अधिकारी डॉ.अक्षय सांगळे यांनी मौजे पांगळोली येथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला.

     यावेळी उपस्थित ग्रामस्थांना पशूंच्या आरोग्याबाबत व सद्य:स्थितीत गुरांच्या घ्यावयाच्या काळजीच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सध्या या गावात पशूसंवर्धन विभागाच्या व स्थानिक प्रशासकीय यंत्रणेच्या तत्परतेने मागील दोन दिवसात एकही पशू दगावलेला नाही. तसेच ज्या पशूंवर उपचार करण्यात आले आहे, त्यांच्या आरोग्यात समाधानकारक सुधारणा झाल्याचेही आढळून आले आहे.

     तरी नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.