सीआयएसएफच्या जवानाला दीड लाख रुपयांचा गंडा
पनवेल दि.११ (वार्ताहर) : ऑनलाईन आधार कार्ड अपडेट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सीआयएसएफच्या जवानाला एका सायबर चोरटयाने मोबाईलवर क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्याच्या खात्यातून दीड लाख रुपयांची रक्कम काढून घेत त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेला सीआयएसएफचा जवान खारघरमध्ये कुटुंबासह राहण्यास असून सध्या तो मुंबई विमानतळावर कार्यरत आहे. या जवानाला सीआयएसएफ फोर्सकडून मिळालेले आयुष्यमान कार्ड हे आधारकार्डसोबत लिंक करायचे होते. त्यासाठी त्याला आधारकार्ड अपडेट करायचे. असल्याने तो गुगलवरुन जवळच्या आधारकार्ड केंद्राचा शोध घेत होता. यावेळी या जवानाने एका वेबसाईटवर सापडलेल्या मोबाईल नंबरशी संपर्क साधला असता तो लागला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी त्याच नंबरवरून सायबर चोरट्याने त्याच्याशी संपर्क साधून त्याला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एसएमएस पाठवित असल्याचा बहाणा करुन त्याला एक लिंक पाठवून दिली. जवानाने लिंक उघडून त्यात आपली माहिती भरल्यानंतर अपडेटचे २५ रुपये चार्जेस भरण्याचा प्रयत्न केला. मात्र जवानाला बँकेकडून ओटीपी न आल्याने त्याने सायबर चोरटयाने संपर्क साधल्यानंतर त्याने या जवानाला आपल्या मोबाईलवर क्विक सपोर्ट हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार जवानाने अॅप डाऊनलोड केल्यानंतर काही वेळातच त्याच्या खात्यातून १४ व्यवहारांद्वारे तब्बल १ लाख ५० हजार काढण्यात आल्याचे मेसेजेस जवानाच्या मोबाईलवर आला.