जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण व सोडतीची कार्यवाही संपन्न


जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण व सोडतीची कार्यवाही संपन्न

 

    *अलिबाग, दि.28 (जिमाका):-* मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील आदेश क्र. रानिआ/नप -2022/प्र.क्र. 02/का.6, दि. 22 जुलै 2022 अन्वये राज्यातील 115 नगरपरिषदा व 9 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम 2022 जाहीर करण्यात आला आहे.

     त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण व सोडतीची कार्यवाही आज दि.28 जुलै 2022 रोजी पार पडली.

     या आरक्षण व सोडतीबाबत हरकत व सूचना स्विकारण्याकरिता आरक्षणाची अधिसूचना नगरपरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच नगरपरिषद व इतर कार्यालयांच्या सूचनाफलकांवर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

     तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.