प्रशासनाची आण-बाण-शान-तत्परतेने वाचविले सहा जणांचे प्राण
अलिबाग,दि.13(जिमाका):- गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची जय्यत तयारी केली आहे; अगदी मनुष्यबळापासून तर आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यासह.
आज दुपारी 3 ते 3.30 च्या सुमारास एकूण 6 युवक उंदीर व खेकडे पकडण्यासाठी अंबा नदीच्या पलीकडे गेले होते. मात्र भरतीमुळे पाण्याची पातळी अचानक वाढली आणि हे युवक पाण्याने वेढले गेले. याबाबतची माहिती मिळताच रोहा प्रांताधिकारी विट्ठल इनामदार, तहसिलदार कविता जाधव, पोलीस निरीक्षक श्री.नारनवर, त्यांचे कार्यालयीन सहकारी आणि महेश सानप यांच्या रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी या सहा युवकांची सहीसलामत सुटका करण्यासाठी तात्काळ उपाययोजना अंमलात आणल्या.
1.रवींद्र मनोरम नाईक 2.अंकुश अनंत नाईक 3.सचिन सुरेश नाईक 4.गणेश गोविंद नाईक सर्व रा.माची सागरगड पोस्ट-खंडाळे ता - अलिबाग 5.समीर सत्यवान नाईक रा - मेडेखार ता - अलिबाग 6.रवींद्र धाकू वाघमारे रा -पळस ता - रोहा अशी या वाचविलेल्या युवकांची नावे आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे नियोजन, त्यांनी प्रशासनातील विविध स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना, आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करणाऱ्या स्वयंसेवकाना ओरिसा येथील चक्रीवादळ आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात पाठविण्याचा निर्णय, आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साहित्याची उपलब्धता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणारे पाठबळ, या सर्वांच्या बळावर जिल्हा प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी किंवा वित्तहानी कमीत कमी होईल याची दक्षता घेण्याचा निर्धारच केलेला आहे.
आणि प्रशासनाने ठरविलेल्या आण-बाण-शान ने आज या सहा युवकांचे प्राण वाचविण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे.यासाठी स्थानिक ग्रामस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
जीव वाचलेल्या सर्व युवकांनी तसेच ग्रामस्थानीही जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.