स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत चला फडकवू तिरंगा, पनवेल तालुक्यातील सर्व घरे, इमारतींवर फडकणार तिरंगा
नवीन पनवेल : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ११ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये देशभरात हर घर झंडा अर्थात चला फडकवू तिरंगा हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. या निमित्ताने पनवेल तालुक्यातील सर्व घरे, इमारतींवर तिरंगा फडकणार आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे देशाभिमान व जाणीव-जागृतीची ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक शासकीय/निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वत: विकत घेऊन उत्साहाने या उपक्रमात सहभागी व्हावे, हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत /पॉलिस्टर / लोकर/ सिल्क/खादीपासून बनविलेल्या कापडाचे राष्ट्रध्वज वापरण्यात यावेत. मात्र यावेळी भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे व जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. प्रत्येक गावात ध्वज वितरण आणि विक्री केंद्राची निश्चिती करण्यात येणार आहे. यात स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घेण्यात येणार असून सर्व शासकीय इमारती / संस्थांवर ध्वजारोहण केले जाणार आहे. हर घर झंडा अर्थात चला फडकवू तिरंगा या उपक्रमात आबालवृद्ध सर्व नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडून करण्यात येत आहे.