जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आयोजित कृषी उत्पादन निर्यातवाढ कार्यशाळेत शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आयोजित कृषी उत्पादन निर्यातवाढ कार्यशाळेत शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन



अलिबाग, दि.19 (जिमाका):- जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करून निर्यात वाढीकरिता जिल्हा निर्यात प्रचालन समिती अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा उद्योग केंद्र व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) अलिबाग” येथे मार्गदर्शन कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

     या कार्यशाळेकरिता अपेडा (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) या संस्थेचे सहाय्यक संचालक श्री.प्रशांत वाघमारे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्री.सतीश भामरे हे उपस्थित होते.

     रायगड जिल्ह्यातील स्थानिक साधन संपत्तीचा व भौगोलिक मानांकित चिन्ह प्राप्त अलिबागचा पांढरा कांदा व आंबा उत्पादन या घटकांचा निर्यात वाढीकरिता शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन जिल्हा उद्योग केंद्रामार्फत करण्यात येईल व जिल्हा निर्यात कृती आराखड्यात या गोष्टींचा समावेश करण्यात आल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळय्या यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

      तसेच कृषी विभागाकडून कृषी माल निर्यातीकरिता शेतकऱ्यांना आवश्यक ते सहाय्य करण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले यांनी स्पष्ट केले.

      कृषी माल निर्यातीकरिताची प्रक्रिया, जागतिक उपलब्ध बाजारपेठ निर्यात विषयक कार्यपध्दती व कृषी मालाची जागतिक स्तरावरील प्रसिध्दी याकरिताच्या माहितीचे सादरीकरण “अपेडा” या संस्थेचे सहाय्यक संचालक श्री.प्रशांत वाघमारे यांच्याकडून करण्यात आले. नंतर कृषी माल निर्यातीबाबत उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन चर्चेद्वारे करण्यात आले.

     कृषी प्रक्रिया उद्योग व उद्योग विभागाकडील आर्थिक अनुदानासंबंधी शासकीय योजना तसेच शेतकऱ्यांनी व्यापारी पद्धतीने कृषी उत्पादन घेवून उपलब्ध बाजारपेठेचा फायदा करून घेवून स्वत:चा आर्थिक फायदा करून घ्यावा, असे आवाहन उद्योग सहसंचालक श्री.सतीश भामरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

     उपस्थित शेतकऱ्यांना वित्तीय व्यवस्थापनाविषयी नाबार्ड चे सहाय्यक महाव्यवस्थापक श्री.प्रदीप अपसुंदे व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री.विजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

     या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकरी व आंबा उत्पादक शेतकरी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

     यावेळी इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी माल प्रक्रिया उद्योग व निर्यात विषयक अधिक माहितीकरिता जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळय्या यांनी केले आहे.