प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत ई-केवायसी
पनवेल(प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा मोठ्या प्रमाणात देशातील शेतकऱ्यांना होत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्यात येत असून तालुका कृषीखाते व शेतकरी सन्मान कक्ष (पनवेल तालुका) यांच्या मार्फत गुळसुंदे येथे नुकताच मोहिम पार पडली तसेच असंघटीत कामगारांसाठी इ-श्रम कार्ड नोंदणी करण्यात आली.उपक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक प्रसाद पाटील,शेतकरी सन्मान कक्ष सदस्य कृषीभुषण मीनेश गाडगीळ, शेतकरी मित्र गणपत गोठळ, ग्रामस्थ योगेश साठे, वैभव भोइर, यांचे सहकार्य लाभले. १ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून देण्यात येणारी एकूण सहा हजाराची रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. भारत एक कृषि प्रधान देश आहे. भारतातील ७५ टक्के लोक शेती करतात किंवा शेतीवर अवलंबून आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन भारत सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहचविण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरूवात केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांना आत्म निर्भर बनवणे तसेच त्यांना सशक्त करणे हे या योजनेचे मुख्य उदिष्ट आहे. त्या अनुषंगाने १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना अखंडपणे लाभ मिळावा, यासाठी शासनाकडून लाभार्थींच्या कागदपत्रांची ई केवायसी करण्यात येत आहे.