नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न-लायन्स क्लब ऑफ श्रीबाग तसेच तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन अलिबाग यांचा स्तुत्य उपक्रम
सचिन पाटील (अलिबाग)-लायन्स क्लब ऑफ श्रीबाग तसेच तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरणा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका संचलित माध्यमिक विद्यालय येथे नुकताच स्पर्शज्ञान (गुड टच अँड बॅड टच) या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माधुरी नारखेडे, शिक्षिका नीता लबडे, कांचन भोये, स्मिता साबळे,मनीषा जाधव, दीपिका भोईर , तसेच शिक्षिका व तेजस्विनी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा भाग्यश्री तांडेल यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉ.ॲड.निहा राऊत यांनी मुलींना व मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यांतील फरक विविध उदाहरणांच्या तसेच तक्त्त्यांच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अशावेळी मुला-मुलींनी घ्यावयाची दक्षता, काळजी व तत्परता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मुला मुलींकडून त्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेवून त्यांचे निरसन केले. तेजस्विनी फाउंडेशनच्या सहसचिव राखी पाटील यांनी मुलांना स्पर्श कसा ओळखावा याविषयी मार्गदर्शन केले तर आजकाल सायबरच्या माध्यमातून गुन्ह्यांचे प्रमाण कसे वाढतात हे उदाहरणांच्या माध्यमातून सांगितले. तेजस्विनी फाउंडेशनच्या संस्थापिका जीविता पाटील यांनी प्रत्येकाने आपले विचार शुद्ध ठेवले पाहिजे, विचार चांगले असतील तर घडणारे आचरण चांगले असेल आणि अर्थातच आचरण चांगले असले म्हणजे आपल्याकडून घडणारी कृती चांगली होते त्यामुळे आपोआपच गुन्हे कमी होतील. सुसंस्कारित पिढी घडणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. लायन्स क्लब ऑफ श्रीबाग अध्यक्षा लायन ॲड कला पाटील, सचिव लायन संदीप वारगे, खजिनदार लायन ॲड.अमित देशमुख यांचे सहकार्य लाभले. तसेच यावेळी डॉ.ॲड.निहा राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका मनीषा जाधव यांनी केले.