ड्रेनेज लाईन मध्ये पडलेल्या गायीला पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या मदतीने काढले सुखरूप बाहेर
पनवेल दि.१२ (संजय कदम) : ड्रेनेज लाईन मध्ये पडलेल्या एका गायीला पनवेल शहर पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले आहे. पोलिसांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
एकविरा हॉटेल ते तक्का दर्गा जाणाऱ्या रोड लगतच्या ड्रेनेज लाईन मध्ये गाय पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक दीपक शेळके यांच्यासोबत पोहवा पृथ्वीराज भोसले, पोहवा सतीश जवरे, पोना विष्णू गावडे ,पोशी बाळासाहेब धनवट आदींच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. लगेचच पोलिसांनी पनवेल फायर ब्रिगेड यांना पाचारण केले. पनवेल शहर पोलिसांचे पथक आणि फायर ब्रिगेडच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गाईला सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी जमलेल्या नागरिकांनी ड्रेनेजवरील झाकणे व्यवस्थित लावण्याची मागणी प्रशासनास केली तसेच गायीला सुखरूप काढल्याबद्दल पोलिसांचे आणि फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले.