शिक्षणदानाचे काम महत्वपूर्ण- वर्षा ठाकूर

 शिक्षणदानाचे काम महत्वपूर्ण- वर्षा ठाकूर


पनवेल(प्रतिनिधी) विद्यार्थी आपल्या गुरुकडे पाहून अनेक गोष्टी शिकत असतो. त्यामुळे शिक्षणदानाचे काम महत्वपूर्ण असते, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी समिती सदस्या वर्षा प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी केले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी प्राथमिक विभागाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. 
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक संतोष चव्हाण, सुभाष मानकर, इंग्लिश विषय सहाय्यक संजय पाटील, पालक प्रतिनिधी उपाध्यक्ष जयंत पाटील पालक प्रतिनिधी सचिव के. साधना,  प्रशांत मोरे, संध्या अय्यर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
         यावेळी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत गुरुमुळे आयुष्यातील अज्ञानाचा अंध:कार दूर होतो, त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरु असावा. असे सांगितले. संजय पाटील यांनी, आपल्याला गुरुचे महत्व समजावे यासाठी आपण प्रत्येकवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतो. गुरुमुळे आपल्यावर चांगले संस्कार होतात आणि या संस्कारांची शिदोरी घेऊन आपण समाजात ताठ मानेने जगू शकतो, असे सांगत गुरुचे महत्व विशद केले. 
दरम्यान, कला चिल्ड्रन अकॅडमीतर्फे या कार्यक्रमाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांबरोबर ऍक्टिव्ह टीचर, ऍक्टिव्ह प्रिन्सिपल, अॅक्टिव्ह आर्ट टीचर तसेच अॅक्टिव्ह स्कूल अवॉर्डचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान गुरु शिष्याचा महिमा वर्णन करण्यासाठी स्नेहल कडव यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याविष्कार सादर करण्यात आला.