स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवनिमित्त स्वातंत्र्याची दिंडी उपक्रमाचा रायगड जिल्ह्यात शुभारंभ: वरसोली येथे रॅली संपन्न
अलिबाग :भारतीय स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट रोजी ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त रायगड जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात स्वातंत्र्याची दिंडी उपक्रम राबविण्यात येत असून, यानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा शुभारंभ सोमवारी (ता.८) जिल्ह्यातील वरसोली येथे रॅली काढून करण्यात आला. या रॅलीत वरसोली जिल्हा परिषद शाळा, इंडियन एज्युकेशन सोसायटी शाळा वरसोली विद्यार्थ्यांसह, गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्या उपस्थितीत रॅलीला हिरवा झेंडा दाखिण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याची दिंडी हा उपक्रम राबविण्यात येत असून, रायगड जिल्हा परिषदेच्या वरसोली येथील रॅलीला जिल्हा परिषद शिक्षण विभाग, भारत सरकार केंद्रीय संचार ब्युरो अहमदनगर, नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, वरसोली ग्रामपंचायत, वरसोली जिल्हा परिषद शाळा, इंडियन एज्युकेशन सोसायटी शाळा वरसोली यांचे सहकार्य लाभले. सदर रॅलीला वरसोली ग्रामपंचायत येथून सुरुवात होऊन वरसोली विठ्ठल रखुमाई मंदिरात सांगता करण्यात आली. रॅलीत भारतमातेची दिंडी काढण्यासोबत विद्यार्थ्यांनी भारतमाता तसेच शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. पथनाट्याच्या माध्यमातून हर घर तिरंगा अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच यावेळी पर्यावरण संवर्धन बाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली.
या रॅलीत जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, माध्यमिक विभाग शिक्षण अधिकारी जोत्स्ना शिंदे-पवार, केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार अहमदनगर प्रतिनिधी फनीकुमार पी., जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन निकम, नेहरू युवा केंद्र जिल्हा समन्वयक निशांत रौतेला, अलिबाग पंचायत समिती गटविस्तार अधिकारी ज्ञानेश्वर साळावकर, वरसोली सरपंच प्रमिला भाटकर, निवृत्त कॅप्टन उमेश वाणी, स्वातंत्र्यसैनिक अमरनाथ राणे, स्वातंत्र्यसैनिक दामोदर पडवळ, जयवंत गायकवाड, मिलिंद कवळे, तपस्वी गोंधळी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते.
................
स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून देशातील नागरिकांमध्ये देशभावना जागृत करण्याचा प्रयत्न स्वातंत्र्याची दिंडी उपक्रमातून करण्यात येत आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान सर्वांनी घरोघरी तिरंगा फडकावून देशाभिमान जपावा. कोणत्याही प्रकारे धाजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा. तसेच अमृत महोत्सव निमित्त प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे.
- निलेश घुले
जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन
..................
स्वातंत्र्याची दिंडी निमित्त जिल्हाभर रॅलींचे आयोजन
जिल्हा परिषद रायगड माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने वरसोली येथे स्वातंत्र्याची दिंडी कार्यक्रमाचे उद्घाटन रॅली काढून करण्यात आले. तसेच यानिमित्त वरसोलीसह जिल्ह्यातील विविध ७५ गावांमध्ये ७५ रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व रॅलींना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांसह नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी रॅलीत सहभागी झाले होते.
...............