सुप्रसिद्ध गायिका मुग्धा गावकर यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध;आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम
पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, नादब्रम्ह साधना मंडळ खारघर आणि पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित करण्यात आलेल्या 'शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन' कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्रावण महिन्यातील निसर्ग व प्रफुल्ल वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात गोवा राज्यातील सुप्रसिद्ध गायिका मुग्धा गावकर यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे, अल्लादिया खांसाहेब स्मृती समारोहाचे अध्यक्ष सुरेश खडके, भजनसम्राट ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी, उस्ताद अजिम खान, ह. भ. प. नंदकुमार कर्वे, सिडको युनियन सेक्रेटरी जे. टी. पाटील, खारघर भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वसंतशेठ पाटील, किरण बापट, गायिका मधुरा सोहनी, मेघा इंगळे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, कार्यक्रमाचे संयोजक सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष सुप्रसिद्ध गायक रायगड भूषण पंडित उमेश चौधरी, यांच्यासह रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुप्रसिद्ध गायिका मुग्धा गावकर यांनी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर करताना अनेक गायकीचे पैलू आपल्या कलेतून सादर केले. त्यांनी पटदिप रागामधील 'बडा खयाल' ने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर पंडित जसराज यांचे प्रसिद्ध अभंग 'ओम नमो भगवते वासुदेवाय', या पंढरीचे सुख, ध्यान लागले रामाचे, हे अभंग सादर करून बाजे मुरलिया या प्रसिद्ध अभंगाने कार्यक्रमाचा समारोप केला. अतिशय सुंदरपणे झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या गायनाने रंगत आणली, त्यामुळे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात रसिक आपल्या आसनावर कायम आसनस्थ होते. त्यांना हार्मोनियमवर वरद सोहनी, तबला साथ रामदास म्हात्रे, पखवाज मधुकर धोंगडे, तर गुरुदास कदम यांची टाळवर साथ दिली. यावेळी आयोजकांच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे संयोजक सुप्रसिद्ध गायक रायगड भूषण पंडित उमेश चौधरी व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. त्याबद्दल रसिकांनीही त्यांचे कौतुक केले.