गोवंश मांसाची साठवणूक करणाऱ्या तळोजातील शीतगृहावर पोलिसांची कारवाई

गोवंश मांसाची साठवणूक करणाऱ्या तळोजातील शीतगृहावर पोलिसांची कारवाई 


पनवेल दि.२३(वार्ताहर): तळोजा एमआयडीसीतील सीबा इंटरनॅशनल शीतगृहावर पोलिसांनी जून महिन्यात छापा मारून तब्बल १ कोटी ५८ लाख रुपये किमतीचे जनावराचे मांस जप्त केले होते. हे मांस गोवंश जनावरांचे असल्याचे कलिना न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी शीतगृहाचे मालक व व्यवस्थापक या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

        तळोजा एमआयडीसीतील सीबा इंटरनॅशनल शीतगृहामध्ये गोवंशसदृश जातीच्या जनावरांचे मांस साठवून ठेवण्यात येत असल्याची माहिती परि. १ चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी या शीतगृहावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १४ जूनला तुर्भे एमआयडीसी व तळोजा पोलीस ठाण्यातील पथकाने संयुक्तरित्या सीबा इंटरनॅशनल शीतगृहावर छापा मारला होता. या कारवाईदरम्यान पोलिसांना जनावरांच्या मासांने भरलेले दोन रेफ्रिजरेटर कंटेनर आढळून आले. त्यात एका कंटेनरमध्ये दिल्ली येथील अल मेहफूज अँग्रो फूड्स कंपनीच्या जनावरांचे मांस असलेले फ्रोजन पॅकिट्स आढळून आले होते. तर दुसऱ्या रेफ्रिजरेटर कंटेनरमध्ये गोवंडी टाटा नगर येथील ग्लोबल अँग्रो इम्पेक्स केना या कंपनीच्या मालकीचे मांस आढळले होते. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत शीतगृहामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जनावरांचे मांस साठवून ठेवल्याचे आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी शीतगृह व दोन्ही कंटेनरमधून सुमारे ८० हजार किलोचे १ कोटी ५८ लाख ३९ हजार रुपये किमतीचे जनावरांचे मांस जप्त केले. त्यावेळी व्यवस्थापकाने दोन्ही कंटेनर व शीतगृहामधील जनावरांच्या मांसाबाबत कोणतेही योग्य ती कागदपत्रे सादर केली नव्हती. त्यामुळे हे मांस कोणत्या जनावरांचे आहे, याबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मांसाचे ११ वेगवेगळे नमुने ताब्यात घेऊन ते कलिना येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. गत आठवडयात न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून मांसाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून मांसाचे नमुने हे गोवंश जनावरांचे असल्याचा अभिप्राय देण्यात आला आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी मांसाची बेकायदेशीररीत्या साठवणूक केल्याप्रकरणी शीतगृहाचे मालक व मैनेजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.