मोहोदर खून प्रकरणी दोघांना जन्मठेप

 मोहोदर खून प्रकरणी दोघांना जन्मठेप

पनवेल दि.२५ (वार्ताहर) : पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील मोहोदर गावात जागेच्या वादातून 58 वर्षीय महिला व तिची मुलगी यांचा निघृण खून करण्याचा प्रकार घडला होता. प्रत्यक्षदर्शी कोणताही साक्षी पुरावा नसताना पोलिसांच्या योग्यरित्या तपासाने दोघाजणांना खुनाप्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी दोघे दोषी आढळून आल्याने न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची तसेच 3 हजार रुपये दंड अशी सजा सुनावली आहे. 

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दित मोहोदर गावात एका झोपडीत निराबाई (58) व तिची मुलगी (30) अशा दोघी राहत होत्या. त्यांचे किराणा मालाचे दुकान होते तसेच त्या झोपडीत त्या दारुची विक्री सुध्दा करत होत्या. त्या झोपडया आमच्या मालकीच्या आहेत असे सांगून कैलास पांडुरंग पवार, पंढरीनाथ पांडुरंग पवार हे दोघे भाऊ नेहमी त्यांच्याशी वाद घालत होते. कैलास पांडुरंग पवार व पंढरीनाथ पांडुरंग पवार हे दोघे निराबाईच्या झोपडीत आले आणि त्यांनी आम्हाला दारु पाहिजे असे सांगून निराबाईला दार उघडायला लावले. निराबाई दार उघडून बाहेर आल्यावर दोघांनी तिच्या डोक्यात दांडुका घालून तिला गंभीर जखमी केले तर हा आरडाओरडा ऐकून तिची मुलगी सुरेखा ही झोपडी बाहेर आल्यावर या दोघांनी तिच्या डोक्यात दांडका मारल्याने तिचा मेंदू बाहेर येवून ती जागीच गतप्राण झाली. या घटनेनंतर दोघेही घटनास्थळावरुन निघून गेले. तोपर्यंत या प्रकाराची माहिती कुणालाही नव्हती.निराबाईच्या शेजारी राहणारी महिला नवशी वाघमारे ही शेतावरुन घरी येत असताना निराबाईचे मागचे दार उघडे होते तर पुढचे दार बंद होते. ते पहायला ती गेल्यावर तिच्या हा प्रकार लक्षात आला. तिने निराबाईची सून अश्‍विनी विश्‍वास भगत हिला हा प्रकार कळविला. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना माहित पडल्यावर पोलीस त्वरीत घटनास्थळी आले त्यांनी गंभीर जखमी झालेल्या निराबाईला एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.  त्यानंतर डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर निराबाईला शुध्द आली. निराबाईला पोलिसांनी विचारपूस करुन घडलेला प्रकार माहित करुन घेतला. सुरेखा हिचा मेंदू जबर घाव डोक्याला बसल्याने जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी निराबाईच्या जबाबावरुन कैलास पांडुरंग पवार व पंढरीनाथ पांडुरंग पवार या दोघा भावांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. खुनाचा तपास पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील कार्यरत अधिकारी सहा. पोलीस निरिक्षक आनंदा महादेव सावंत यांनी सुरु केला आणि सर्व साक्षी पुरावे जमा करुन प्रकरण न्यायालयात नेले. न्यायालयाने सरकारी पक्षातर्फे 17 साक्षीदार तपासले आणि त्यातून दोघेही दोषी आढळले. कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना पोलिसांनी योग्यरित्या तपास करुन दोघांना अटक करुन साक्षीदार तसेच पंच गोळा केल्याने केस भक्कम झाली. पोलिसांच्या तपासाने खर्‍या गुन्हेगारांना शिक्षा दिली. या गुन्हयाचा पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील कार्यरत सहा. पोलीस निरिक्षक आनंदा महादेव सावंत यांनी यशस्वीरित्या तपास केली पोलीस हवालदार सुनील केदार, पोलीस नाईक विवेक म्हात्रे यांचे तपासकामी सहकार्य लाभले.