विवाहितेचा छळ करून तिला पेटवून देणाऱ्या क्रूरकर्मा नराधम नवरा आणि सासूला जन्मठेप

विवाहितेचा छळ करून तिला  पेटवून देणाऱ्या क्रूरकर्मा नराधम नवरा आणि सासूला जन्मठेप

...........................................

 *पोलीस यंत्रणा आणि न्यायदेवतेचे  शतशः आभार; अखेर सत्याचा विजय - हिरामण टावरी* 

...........................................

नवीन पनवेल(रत्नाकर पाटील):

पनवेल तालुक्‍यातील तालुका  पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असलेल्या कासारभट येथे २०१५ साली विवाहितेचा छळ करून तिला जाळून मारण्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी या कामी  गुन्हा रजिस्‍टर नं.  १५३/२१५ भारतीय दंड विधान कलम ३०२, ३०४ ब, ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून विवाहितेचा पती, सासू व इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली होती. 

या गुन्ह्याची सविस्तर हकीकत अशी की,  पेण तालुक्यातील रावे येथे राहणारी ज्‍याेती हिरामण टावरी हिचा विवाह पनवेल तालुक्‍यातील कासारभट येथील निलेश म्‍हात्रे यांच्याबरोबर 02 मे 2015 रोजी झाला होता. लग्‍न झाल्‍यावर काही दिवसातच सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. आणि त्‍यांनी आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली. नवरा, सासू, सासरे व नंदावा यांनी तिचा अमानुष छळ करण्यास सुरुवात केली. ज्‍योतीचा पती निलेश हा फ्लॅट घेण्यासाठी हुंडा म्‍हणून माहेरून पैसे आणण्यास वेळोवेळी सांगून तो तिचा मानसिक छळ करीत होता. लग्‍न झाल्‍यापासून निलेश ज्‍योतीबरोबर कधीही व्यवस्थित वागला नाही, त्यातच ज्‍योती आपल्‍या मागण्या पूर्ण करीत नसल्‍याने 20 ऑक्टोबर, 2015 रोजी निलेश यांनी त्‍यांच्या घरातील किचनमध्ये तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले व दरवाजाची कडी लावून तो पसार झाला. हा प्रकार गावात समजल्‍यावर ज्‍योतीचे वडील हिरामण टावरी घटनास्‍थळी आले व त्‍यांनी पनवेल तालुका पोलीस स्‍टेशनमध्ये याची माहिती देवून ज्‍योतीच्या पती तसेच इतरांविराेधात सदर गुन्ह्याची तक्रार दिली. याचवेळी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून दोषारोप ठेवला. सात वर्षांनंतर न्यायालयात खटल्‍याची सुनावणी सुरू झाली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील वाय. एस. भोपी यांनी एकूण बारा साक्षीदार तपासले व जोरदार युक्‍तीवाद केला. आरोपी पक्षातर्फे वकील अरविंद चामले, एम. एम. गुंजाळ, इंद्रजीत भोसले यांनी काम पाहिले. दोन्ही पक्षाचा युक्‍तीवाद ऐकून मे. न्यायालयाने क्रूरकर्मा नराधमांना अखेर कठोर शिक्षा सुनावली. 

पनवेल येथील अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश जे. डी. वडणे यांनी आरोपी पती निलेश रामकृष्‍ण म्‍हात्रे, सासू मालती रामकृष्‍ण म्‍हात्रे यांना दोषी ठरवून ज्‍योतीचा अमानुष छळ व खून केल्‍या प्रकरणी जन्मठेपेची  शिक्षा ठोठावली. त्‍याचप्रमाणे दोघांना 60 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्‍कम नुकसान भरपाई म्‍हणून फिर्यादी यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणाऱ्या खटल्‍याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर न्यायदेवतेने योग्य निकाल देऊन आणि आणि पोलिस प्रशासनाने केलेल्या योग्य तपास यंत्रणेमुळे आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्‍यामुळे ज्‍योतीला खरोखरच न्याय मिळाला असल्‍याचे त्‍यांच्या नातेवाईकांतून बोलले जाते. 

सदर खटल्या कामी सरकारी वकील सी.वाय. पाटील, तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर, पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ, तपासिक अधिकारी दिलीप राख, पोलीस हवालदार सुनील केदार, पोलीस नाईक विवेक म्‍हात्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हुंडाबळी आणि खून अशा घटना सतत वाढत असल्‍याने न्यायालयाच्या या निकालाने समाजासाठी हा इशारा ठरणार असल्‍याचे बोलले जात आहे.