विद्यार्थ्यानी 5 जी चा वापर आपल्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी केला पाहिजे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पनवेल(प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून आज (शनिवारी) ऑनलाईन जिओच्या 5 जी सेवेचा शुभारंभ केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पनवेल पोदी वरील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेत उपस्थित राहून या सेवेचा शुभारंभ केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. या सेवेचा फायदा आपल्या सुरक्षिततेसाठी, चांगले दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी करा. त्यामध्ये मनोरंज, सिनेमा व गेम आहेतच पण त्यातील चांगल्या बाबी घ्या, बाकी वगळा. आपला फोकस विद्यार्थ्यानी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी केला पाहिजे असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून ऑनलाईन जिओच्या 5 जी सेवेचा शुभारंभ केला. यावेळी पनवेल येथील महापालिकेच्या ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले शाळेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विद्यार्थ्यांसोबत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सेवेतील शिक्षणाशी निगडीत असा प्रयोग आपल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील महापालिकेच्या ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले शाळेची निवड केल्याबद्दल प्रधान मंत्री नरेंद्र मोदी, नामदार अश्विनी वैष्णव आणि त्यांच्या टीमला यावेळी धन्यवाद दिले . यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, प्रधान सचिव भुषण गगराणी, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, ज्येष्ठनेते वाय.टी.देशमुख, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, तेजस कांडपीळे, माजी नगरसेविका सुशीला घरत व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 5 जी तंत्र ज्ञानाचे लोकार्पण झाले आहे. आपल्या राज्याच्या दृष्टीने ही महत्वाचा दिवस आहे. एका क्रांतिकारक क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. आज 5 जीचे लोकार्पण झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा क्षण आहे. ज्या ठिकाणी नेट नाही तेथे आता नेट मिळेल. 5 जी च्या माध्यमातून सगळ्या शाळा एकमेकांशी जोडल्या जातील त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावला जाऊ शकतो. शिक्षकांसाठीही उपयुक्त माध्यम आहे. त्यांचे ही प्रशिक्षण या माध्यमातून करण्यात येईल. वैद्यकीय क्षेत्रात देखील यामुळे क्रांति घडेल. दृश्य माध्यमामुळे मुलांना त्याचे लवकर आकलन होऊन त्यांच्या आकलन शक्ति मध्ये प्रभावी परिवर्तन होईल. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयात देखील याचा उत्तम वापर होऊ शकतो. यामुळे नॉर्मल क्लासेस स्मार्ट क्लासेस मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. त्यामुळे उत्तम दर्जाचे शिक्षण मिळू शकेल. ई. लर्निग, डिजिटल क्लास रूम, शिक्षक प्रशिक्षण आणि ऑन लाईन शिक्षण कोणताही अडथळा न येता जलदगतीने मिळू शकते. शिक्षकांना ही त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर शेती मध्ये ही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. बँकिंग, वैद्यकीय सेवेत ही त्याचा आपण जसा वापर करत जाऊ तसा फायदा होणार आहे. त्यामुळेच 5 जी मुळे देशात डिजिटल क्रांति होणार आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.