दिवाळीअंक हे मराठी वाङ्मयीन संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण अंग- आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल(हरेश साठे) मराठी साहित्य परंपरेला अनुसरून दिवाळी अंकाची निर्मिती होत असते, आणि त्यातून नवनवीन साहित्य वाचकांपर्यंत पोहोचत असते, त्यामुळे दिवाळी अंकांना साहित्य परंपरेत अनन्य साधारण महत्व असून दिवाळीअंक हे मराठी वाङ्मयीन संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. गणपत वारगडा संपादित आदिवासी सम्राट, आप्पासाहेब मगर संपादित जनसभा, साहिल रेळेकर संपादित दीपोत्सव, राजमुद्रा फाऊंडेशनच्या राजमुद्रा, बबिता बर्वे संपादित सदैव जागृत आदी विविध दिवाळी विशेषांकांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निमित्ताने म्हंटले कि, दिवाळी अंक म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्यिक-सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वाची खूण आहे, त्यामुळे फराळ आणि फटाक्यांबरोबरच वार्षिक दिवाळी अंकांची फर्माईश ही मराठी माणसाची एक खासियत आहे. विविध माहिती आणि लेख, कला, कविता, लघुकथा, मुलाखत, प्रवासवर्णने भाषिक अलंकारांनी सजलेला दिवाळी अंक वाचकांना हवाहवासा वाटतो. डिजिटल युगात प्रसार माध्यमांत स्पर्धा वाढल्या आहेत, मात्र कितीही संकटे आली तरी दिवाळी अंकांच्या गेल्या १११ वर्षांच्या परंपरेत खंड पडलेला नाही. वाचकांची संख्या घटत आहे, अशी ओरड दरवर्षी होते, मात्र तसे न होता दर्जेदार साहित्यामुळे दिवाळी अंकांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हि अंक निर्माते, साहित्य दर्दी वाचकांसाठी सुखावह बाब असून हि साहित्य परंपरा अखंडित ठेवण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी सदैव आहोत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना अधोरेखित केले.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कॄतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी, यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने गेल्या २१ वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे, यंदा ही २२ वी स्पर्धा आहे, असून बक्षिसांच्या रक्कमेत भरघोस वाढ करण्यात आली असून राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मानकरीला ०१ लाख रुपये तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ४० हजार रुपये बक्षिस देऊन सन्मानित करण्यात असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त दिवाळी अंक निर्मात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर त्यांनी या निमित्ताने केले. या प्रकाशन सोहळ्यास भाजपचे युवा नेते समीर कदम, युवा नेते अमित घाग, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, सय्यद अकबर, असीम शेख, विशाल सावंत, किरण बाथम, शंकर वायदंडे, प्रविण मोहोकर, सुभाष बसवेकर आदी उपस्थित होते.