एक्स-रे बॅगेज स्कॅनिंग मशीनव्दारे नमुंमपा मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम
नवी मुंबई (प्रतिनिधी) -नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्यालय इमारत ही वेगळया स्वरुपाच्या आकर्षक वास्तुरचनेमुळे आयकॉनिक इमारत म्हणून देशभरात नावाजली जाते. या ठिकाणी विविध कामांकरिता नागरिकांची तसेच अभ्यागतांची नेहमीच वर्दळ असते सदयस्थितीत रस्त्यावरील मुख्य प्रवेशव्दारावर नागरिकांची रजिस्टरला नोंदणी करुन मुख्यालयात प्रवेश देण्यात येतो. या ठिकाणी मानवीय पध्दतीने व्यक्तींची व त्याच्याकडील बॅग व इतर सामानांची तपासणी करण्यात येते. सदर पध्दतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करणे प्रस्तावित होते.
त्या अनुषंगाने मुख्यालयात आणलेल्या सुरक्षा उपकरणामधील एक्स् - रे बॅगेज स्कॅनिग मशीन महापालिका आयुक्त् श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते आजपासून कार्यान्वित करण्यात आली. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त् श्री. नितिन नार्वेकर, शहर अभियंता श्री. संजय देसाई, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, भांडार विभागाचे उपआयुक्त श्री. अनंत जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
एक्स् - रे बॅगेज स्कॅनिग मशीनव्दारे महापालिका मुख्यालयात येणा-या व्यक्तीकडील साहित्य या स्कॅनिग मशीन मधील स्वयंचलित पट्ट्यावर ठेवले जाणार असून मशीनव्दारे त्या साहित्याचे स्कॅनींग होऊन असुरक्षित वस्तू असल्याचे त्वरीत निदर्शनास येणार आहे. मुख्यालयातील तळमजल्यावरील प्रवेशव्दार व तळघरातील प्रवेशव्दार (बेसमेंट) या दोन ठिकाणी या स्कॅनिग मशीन ठेवण्यात येणार असून त्या हाताळण्याचे रितसर प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे नमुंमपा मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत भर पडली असून ती अधिक सक्षम झाली आहे.
अशाचप्रकारे महापौर कार्यालय व आयुक्त कार्यालय या ठिकाणी पोल डिटेक्टर सुरक्षा साधने कार्यान्वित करण्यात आली आहेत. या माध्यमातून असुरक्षित वस्तूंवर काटेकोर नजर ठेवली जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीची सुरक्षा व्यवस्था सक्षम होण्याकरिता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या शासकिय संस्थेने सुरक्षा परीक्षणामध्येही ही उपकरणे बसविणेबाबात सूचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात दोन एक्स - रे बॅगेज स्कॅनिग मशीन्स व दोन पोल डिटेक्टर सुरक्षा उपकरणे कार्यान्वित होत असून लवकरच व्हिझिटर मॅनेजमेंट सिस्टीम, व्हेईकल स्कॅनिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. याव्दारे महानगरपालिका मुख्यालयात येणा-या नागरिक व अभ्यागत यांची सर्व माहिती घेऊन व त्यांना ई - पास देऊनच मुख्यालयात प्रवेश दिला जाईल. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यालयात येणा-या वाहनांची यांत्रिकी तपासणी करुनच आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.