रविवारी पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'
पनवेल(प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या 'दिवाळी पहाट' चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६ वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार आहे.
दरवर्षी संगीत रसिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. यंदा दिवाळी पहाटचे सहावे वर्ष असून या दिवाळी पहाट मध्ये झी मराठी लिटिल चॅम्प फेम प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शमिका भिडे, तसेच सूर नवा ध्यास नवा स्पर्धक प्रणय पवार हे प्रसिद्ध गायक मंडळी सुश्राव्य गाण्यांची मैफिल सादर करणार आहेत. तर या सोहळ्याचे निवेदन निवेदिका धनश्री दामले ह्या करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून या प्रवेशिकेसाठी रोहित जगताप ८६९१९३०७०९, गौरव कांडपिळे ९९२०८६८००८ किंवा अभिषेक भोपी ९८२०७०२०४३ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या सुरेल मैफलीचा संगीत रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे.