आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कोकण संध्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
पनवेल / प्रतिनिधी- वृत्तपत्र सृष्टीमध्ये तब्बल सोळा वर्षांपूर्वी पनवेलच्या शासकीय विश्रामगृहामध्ये पेरलेले साप्ताहिक कोकण संध्या या वृत्तपत्राचा बघता-बघता सोळा वर्षांत महावृक्ष झाला आहे. असंख्य वाचक, जाहिरातदार, व्यावसायिक हितचिंतक आणि कोकण संध्या परिवारातील रायगड, ठाणे शहर व परिसरातील पत्रकार यांच्या परिश्रमाने आज साप्ताहिक कोकण संध्या एक वटवृक्ष रायगड, नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरात उभा राहीला. वृत्तपत्र सृष्टीच्या गर्दीत साप्ताहिक कोकण संध्या तब्बल सोळा वर्ष यशस्वी वाटचाल करीत वाचक, जाहिरातदार, हितचिंतक यांच्या कसोटीला उतरलेले रायगड, नवी मुंबई आणि ठाण्यातील एकमेव साप्ताहिक म्हणजे कोकण संध्या ठरले आहे. या सोळा वर्षांच्या आणि दिड दशकाच्या वाटचालीत अनेक अनुभव आणि अनुभवाच शिदोरी कोकण संध्या परिवाराच्या गाठीशी आहे. तब्बल १६ वर्षांचा काटकसरीचा वनवास आणि खडतर प्रवासाचा वनवास पूर्ण करीत सक्षमपणे सोळा वर्ष सुरळीत आणि अखंडित एकसंघ वाटचाल कोकण संध्या परिवाराने करून आता यंदा १७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. दरम्यान या सोळा वर्षांच्या कालावधीत अनेक मित्र भेटले, नवीन जाहिरातदार यांचे आशीर्वाद लाभले, समाजातील चांगल्या लोकांचे देखील आशीर्वाद लाभले. कोकण संध्याची वाटचाल थांबावी, वाटचालीला आळा बसावा, वृत्तपत्र बंद पडावे अशा प्रकारच्या कुरघोड्या करणाऱ्या लोकांचा सामना साप्ताहिक कोकण संध्या परिवाराने मोठ्या निकराने केला आणि या स्पर्धेत कोकण संध्या यशस्वी ठरला. अनेक समस्या, अनेक अडचणी समोर आल्या, मात्र कोकण संध्याची आगेकूच कधीच थांबली नाही, धडाडीने वाटचाल करीत प्रत्येक आठवड्याला वाचकांच्या आणि जाहिरातदारांच्या, हितचिंतकांच्या भेटीला 'कोकण संध्या' सातत्याने सोळा वर्ष येतच राहिला. कुठलीही समस्या असो, त्यावर मात करीत कोकण संध्याच्या अखंड वाटचालीला अथक प्रयत्न केल्यानंतरही कुणीही थांबवू शकले नाही हे एक विदारक सत्य आहे अशा या बेधडक सत्य मांडणाऱ्या कोकण संध्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी कोकण संध्याचे संपादक दीपक महाडिक, मुख्य संपादक केवल महाडिक, पत्रकार विवेक पाटील, मंदार दोंदे, सय्यद अकबर, किरण बाथम, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. कोकण संध्या दिवाळी अंकात सामाजिक उपक्रमांची व परिसरातील घडामोडींची माहिती देण्यात आली असून या अंकाला वाचकांचा प्रतिसाद लाभत आहे.