संविधान दिनाचे औचित्त्य साधून पर्यटन संचालनालयामार्फत एक दिवसीय नि:शुल्क सहलीचे आयोजन
नवी मुंबई, दि. 29 :- संविधान दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित घटना, इतिहास आणि त्यांच्या कार्याची माहिती सामान्य जनतेला मिळण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयामार्फत “टूर सर्किटद्वारे” *दि.3 व 4 तसेच 7 व 8 डिसेंबर, 2022* या कालावधीत कोकणातल्या *महाड येथील चवदार तळे आणि गांधारपाले बौध्द लेणी* या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी *नि:शुल्क एकदिवशीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.* अशी माहिती पर्यटन संचालनालय, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित विविध पैलूंची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने त्यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे व बुध्दिस्ट स्थळांचा समावेश असलेल्या पर्यटन ‘टूर सर्किटचे’ मा.मुख्यमंत्री व मा.पर्यटनमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच उद्घाटन झाले. या टूर सर्किटमध्ये विभागनिहाय मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या जिल्हयांमधील पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने कोकण विभागातून टूर सर्किटकरीता महाड येथील चवदार तळे आणि गांधारपाले बौध्द लेणी या ऐतिहासिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. ही एकदिवशीय सहल असून यासाठी पर्यटकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
या सहलीमध्ये पर्यटकांसाठी बससेवा, गाईड, अल्पोपहार, दुपारचे जेवण व पिण्याचे पाणी या सर्व सुविधा नि:शुल्क पुरविण्यात येणार आहेत. "प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा प्राधान्य" या शर्तीवर सहलीचे आरक्षण स्विकारण्यात येणार असून *दि.3 व 4 डिसेंबर,2022 च्या सहलीचे आगाऊ आरक्षण दि.1 डिसेंबर,2022 पर्यंत व दि.7 व 8 डिसेंबर,2022 च्या सहलीचे आगाऊ आरक्षण दि.5 डिसेंबर,2022 पर्यंत करणे अनिवार्य आहे.* आगाऊ आरक्षणासाठी तसेच सहली संदर्भात *अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र.9930359384/9421051708 या क्रमांकांवर तसेच ddtourisum.kokan-mh@gov.in या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा.* या सहलींसाठीच्या बसेस सीबीडी, बेलापूर/कोकण भवन, नवी मुंबई या बसस्थानकांवरून नियोजित वेळेवर वर नमूद तारखांना सोडण्यात येतील.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहिती मिळविण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालय कोकण विभाग, नवी मुंबईचे उपसंचालक (पर्यटन) श्री हनुमंत कृ. हेडे यांनी केले आहे.