शासकीय व इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करुन घ्यावे

 

शासकीय  व इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी 

आधारकार्ड अद्ययावत करुन घ्यावे


अलिबाग,दि.14(जिमाका) :- ज्या नागरिकांना आधारकार्ड मिळाले आहे, परंतु दहा वर्षांमध्ये एकदाही अद्ययावत केलेले नाही, अशा आधारकार्डधारकांसाठी “डॉक्युमेंट अपडेट” हे नवीन फिचर विकसित करण्यात आले आहे. नागरिकांनी ओळखीचा पुरावा आणि रहिवासी पुरावा कागदपत्रे अद्ययावत करून त्यांचा आधार अद्ययावत करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांना “डॉक्युमेंट अपडेट” करण्याचे आहे, त्यांनी My Aadhaar (ऑनलाईन) पोर्टलद्वारे किंवा कोणत्याही आधार नोंदणी केंद्र भेट देऊन आपले आधारकार्ड अद्ययावत करण्यात यावे.

 सन 2011 पासून देशांमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटीज ऑफ इंडिया यांच्यामार्फत देशातील नागरिकांना आधारकार्ड देण्यात येते. बायोमेट्रिक प्रमाणिकरणासह रहिवाशाची ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड हा ओळखीचा सर्वात व्यापकपणे स्वीकारला जाणारा पुरावा आहे. नागरिकांकडून अनेक शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डचा वापर केला जातो. यापुढे शासकीय  व इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना नवीन आणि अद्ययात तपशीलांसह आधारकार्ड सादर करणे आवश्यक  आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी,  असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) तथा नोडल अधिकारी सर्जेराव मस्केपाटील यांनी कळविले आहे.