तीन पानशॉपवर टाकलेल्या छाप्यात गुटखा व पानमसाल्याचा साठा हस्तगत
पनवेल दि. ०९ ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यातील कळंबोली खिडुकपाडा येथील तीन पानशॉपवर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात गुटखा व पानमसाल्याचा साठा हस्तगत करण्यात आला आहे .
पेण येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त (अन्न) ल. अं. दराडे, अन्न सुरक्षा अधिकारी वि. वि. शिंदे व स. रा. आढाव व त्यांच्या पथकाने कळंबोली खिडुकपाडा येथील तीन पानशॉपवर छापे मारले. यात रामदुलारे प्रजापती पानशॉप, श्रीराम जेस्वाल पानशॉप, आणि खजांची प्रसाद गौड पानशॉप या तीन पानशॉपचा समावेश होता. येथे त्यांना गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला. त्यावर त्यांनी हा साठा जप्त करून त्यांचे शॉप सील करत रामदुलारे प्रजापती (२८), श्रीराम जेस्वाल (४९) आणि खजांची प्रसाद गौड (४८) या तिघांना ताब्यात घेतले आहे .