राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत “निक्षय मित्र” बनण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत “निक्षय मित्र” बनण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन


अलिबाग, दि.04 (जिमाका):- क्षयरुग्णांना सामुदायिक सहाय्य हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळावे यासाठी समाजातील विविध भागधारक (सहकारी कॉर्पोरेट, निवडून आलेले प्रतिनिधी, वैयक्तिक संस्था) क्षयरुग्णांना सहाय्य देवून मदत करुन आपण निक्षय मित्र बनू शकता. तरी जिल्ह्यातील इच्छुक नागरिकांनी निक्षय मित्र बनण्यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले.

     केंद्र शासनाने प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान सुरु केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दि.9 सप्टेंबर 2022 रोजी “प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान” या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना, संस्थांना क्षयरोग मुक्त भारत बनण्यासाठी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

     यामध्ये निक्षय मित्रांच्यामार्फत क्षयरुग्णांना 6 महिने ते 3 वर्षासाठी कोरडा आहार पुरविण्यात येणार आहे. या आहारात पुढील विकल्प निश्चित करण्यात आले आहेत.

     *अन्नाची टोपली:-* *विकल्प 1:-* *साहित्य:* *गहू/बाजरी* (मोठ्या व्यक्तींकरिता- 3 किलो, लहान बालकांसाठी- 2 किलो), *डाळ* (मोठ्या व्यक्तींकरिता- 1.5 किलो, लहान बालकांसाठी- 1 किलो), *तेल* (मोठ्या व्यक्तींकरिता- 250 ग्रॅम, लहान बालकांसाठी- 150 ग्रॅम), *दुध पावडर* (मोठ्या व्यक्तींकरिता- 1 किलो, लहान बालकांसाठी- 750 ग्रॅम).

     *विकल्प 2:-* *साहित्य: गहू/बाजरी* (मोठ्या व्यक्तींकरिता- 3 किलो, लहान बालकांसाठी- 2 किलो), *डाळ* (मोठ्या व्यक्तींकरिता- 1.5 किलो, लहान बालकांसाठी- 1 किलो), *तेल* (मोठ्या व्यक्तींकरिता- 250 ग्रॅम, लहान बालकांसाठी- 150 ग्रॅम), *अंडी* (मोठ्या व्यक्तींकरिता- 30, लहान बालकांसाठी- 30), *दुध पावडर* (मोठ्या व्यक्तींकरिता- 1 किलो, लहान बालकांसाठी- 750 ग्रॅम).

     ज्या इच्छुक नागरिकांना या क्षयरोग मुक्त भारत अभियानामध्ये सक्रिय होऊन क्षयरुग्णांना सहाय्य करायचे आहे, त्यांनी जिल्हा क्षयरोग केंद्र, रायगड-अलिबाग, (कार्यालयीन संपर्क: 02143-224703, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील मोबाईल क्रमांक- 9423893307, ई-मेल: dtomhrgd@rntcp.org) या पत्त्यावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग केंद्राकडून करण्यात आले आहे.