“मराठा वॉर मेमोरियल होस्टेल” बेळगावच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसम्मेलनासाठी हजर रहावे-संजय पाटील

“मराठा वॉर मेमोरियल होस्टेल” बेळगावच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसम्मेलनासाठी हजर रहावे-संजय पाटील



बेळगांव(प्रतिनिधी)- पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात मराठयांनी गाजवलेल्या शौर्याचे प्रतिक म्हणून  1935 साली  “मराठा वॉर मेमोरियल हॉस्टेल”ची बेळगाव येथे स्थापना झाली.  ब्रिटिश सरकारने “मराठा लाईट इंन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव”च्या अधिपत्याखाली  1935 मध्ये याची स्थापना  केली होती. याच हॉस्टेलचा विस्तार 1991-92 मध्ये मुलींसाठीच्या  हॉस्टेलचीही  निर्मिती करून करण्यात आला. यावर्षी या हॉस्टेलने 87 वर्षे पूर्ण केली आहेत. तर जवळजवळ 100च्या आसपास सैन्य दलाला अधिकारी दिलेले आहेत. अशा या हॉस्टेलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम बेळगाव येथे दि. 26 व 27 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. त्यासाठी हॉस्टेलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन या कार्यक्रमाचे समन्वयक संजय पाटील यांनी केले आहे.

1935 पासून सुरू झालेल्या या हॉस्टेलला सैनिक तयार करणारी फॅक्टरी म्हटले जाते. या हॉस्टेलच्या जवळपास १०० हून विद्यार्थी कमिशन घेऊन सैन्य दलात मोठे अधिकारी झाले आहेत. या हॉस्टेलमधील अनेक विद्यार्थी सैन्य दलाच्या विविध विभागांसह नेव्ही व एअरफोर्समध्ये  शिपाई  ते वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आहेत. तर आजही काही जण देशसेवेसाठी कार्यरत आहेत. तर डॉ. मधुकर जगताप यांनी हॉस्टेलच्या या विद्यार्थ्यांमध्ये पहिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. तर डॉ. नेताजी मुळीक हे हॉस्टेलचे दुसरे डॉक्टर झालेले विद्यार्थी असून ते मेंटल हॉस्पिटल ठाणे येथे कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात चिंचनेरचे श्री. बर्गे, सैनिक टाकळीचे प्रा. आर एस पाटील, कोल्हापूरचे प्रा. घराळ सर, चंदगड तालुक्यातील संजय परशुराम पाटील यांनी पत्रकारीतेसह   शैक्षणिक क्षेत्रात  काम केले आहे. सातारचे निवृत्त कर्नल अरुण जाधव हे एनडीएच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ट्रेनिंग देण्याचे काम करीत आहेत. अशा विविध क्षेत्रात मोलाचे काम करणारे अनेक विद्यार्थी या हॉस्टेलने देशाला दिलेले आहेत.

1993 साली मुंबईत दादर येथील आरडीएक्स्युक्त स्कुटर बॉम्ब निकामी करणारे श्री. वसंत जाधव हे सैन्य दलातील निवृत्त मेजर आहेत. तर क्रीडा क्षेत्रात 2020 मध्ये घोडस्वारीतील टेंट पेगिंग या प्रकारात अर्जुन पुरस्कार पटकावणारे  श्री. अजय सावंत हे आज एनडीए ट्रेनिंग सेंटर पुणे येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.                   कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल, करवीर शाहुवाडी, गारगोटी, इचलकरंजी सह, सातारा, सांगली, सावंतवाडी, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. त्यामुळे  महाराष्ट्र व अन्य राज्यातील माजी विद्यार्थ्यांनी सुध्दा यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

1935 ते 2020 पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना मराठा वॉर मेमोरियल हॉस्टेल बेळगाव येथे एकत्र येण्याची संधी या  स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मिळणार आहे.  तरी सर्व माजी विद्यार्थ्यांनी समन्वयक संजय पाटील 9867111481, किरण भोईटे – 9423841718, कॅप्टन प्रकाश खोत – 9412643107, चंद्रकांत जाधव – 7889664255 यांच्याशी संपर्क साधावा.