मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील रायगड जिल्हा प्राथमिक फेरीला सुरुवात
पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या 'अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका' स्पर्धेतील रायगड जिल्हा प्राथमिक फेरीचे उद्घाटन दिग्दर्शक, अभिनेते व लेखक दीपक पवार, लेखक व अभिनेते राहुल वैद्य यांच्या हस्ते आज (दि. १९) खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाले.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे खजिनदार अमोल खेर, सांस्कृतिक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप, चिन्मय समेळ, निखिल गोरे, ओंकार सोष्टे, कौस्तुभ सोमण तसेच सिकेटी महाविद्यालय व टीम अटल करंडक चे सदस्य व कलावंत उपस्थित होते. या रायगड जिल्हा प्राथमिक फेरीत १९ व २० नोव्हेंबरला एकूण २१ एकांकिका सादर होणार आहेत.
नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे हि स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप आहे.