फार्म हाऊसवर चोरी, गुन्हा दाखल
नवीन पनवेल : मालडुंगे येथील फातिमा फार्म हाऊस येथे खिडकीचा ग्रील उचकटुन चोरट्याने हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल येथील साद कादिर करेल यांचा मालडुंगे येथे फार्म हाऊस आहे. चोरट्याने पाच हजार रुपये किमतीचा मनगटी घड्याळ, साडेतीन हजार रुपयांच्या चांदीचे ग्लास, 3 हजार 600 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला आहे.
फ्लॅटचा ताबा न देता दुसऱ्या व्यक्तीला देऊन केली सत्तावीस लाखांची फसवणूक
नवीन पनवेल : रूमचा ताबा न देता त्या फ्लॅटचा ताबा दुसऱ्या व्यक्तीला देऊन एका शिक्षकाची सत्तावीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी विरोधात पनवेल तळोजा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई येथील शिक्षक महंमद फरहत अली मोहम्मद कृषिद अली यांना नवीन फ्लॅट घ्यायचे असल्याने इस्टेट एंजंट सोमरंजन उन्नी यांच्या कामोठे येथे ऑफिसला गेले. त्याने जयराम बी रॉय, सूर्या बिल्डर अँड प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स यांची ओळख करून दिली. त्यांनी नावडे फेस येथील अष्टविनायक बिल्डिंग मधील फ्लॅट दाखवला. यावेळी 24 लाख 32 हजारात फ्लॅट घेण्याचे ठरल्याने चार लाख बत्तीस हजार रुपये सोमरंजन उन्नी देण्यात आले. त्यानंतर रजिस्ट्रेशनच्या वेळी जयराम रॉय यांनी तीन लाख रुपये रोख रक्कम घेतली . त्यानंतर बँकेतून वीस लाख रुपयांचे गृह कर्ज घेऊन ते धनादेशाद्वारे जयराम रॉय यांच्या खात्यात जमा केले. 2013 मध्ये फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले. मात्र फ्लॅटचा ताबा देण्यास उशीर होईल असे सांगण्यात आले. पुढील दोन वर्षे वेगवेगळी कारणे सांगून जयरामने फ्लॅटचा ताबा देण्याचे टाळले. त्यामुळे कामोठे व खारघर येथील कार्यालयात जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही त्यांना भेटत नव्हते.
त्यानंतर 2019 मध्ये मोहम्मद हे अष्टविनायक बिल्डींगमध्ये गेले असता त्यांच्या नावे रजिस्ट्रेशन असलेला फ्लॅटमध्ये दुसरा ईसम राहत असल्याचे त्यांना दिसले. जयराम रॉय यांच्याकडे चौकशी केली असता फ्लॅटचे नंबर लिहीण्यात चूक झालेली असल्याचे त्यांनी सांगितले. व 203 रूमचा ताबा देतो असे सांगण्यात आले . त्यामुळे ऑक्टोबर 2019 मध्ये तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला. त्यानंतर फ्लॅटचा ताबा एका महिन्यात देतो असे सांगण्यात आले. मात्र कोरोना महामारीमुळे जयराम यांच्याकडे जाता आले नाही. त्यांना फोन केला असता ते फोनवर प्रतिसाद देत नव्हते. म्हणून 2021 मध्ये अल्पसंख्यांक आयोग, मुंबई यांच्याकडे दाद मागितली यावेळी देखील मुदत मागून जयराम याने रूमचा ताबा दिला नाही. त्यामुळे तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला. 2013 पासून 24 लाख रुपये फ्लॅटचे व तीन लाख रुपये रजिस्ट्रेशनचे असे एकूण 27 लाख 32 हजार रुपये घेऊन रूमचा ताबा न दिल्या प्रकरणी जयराम बी रॉय आणि इस्टेट एजंट सोमरंजन उंनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.