जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची दूरदृष्टी पहिल्या 50 जणांच्या तुकडीचे सुरु झाले प्रशिक्षण

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची दूरदृष्टी पहिल्या 50 जणांच्या तुकडीचे सुरु झाले  प्रशिक्षण

 


अलिबाग,दि.14(जिमाका):- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,नवी दिल्ली यांच्याकडून राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये आपदा मित्रांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यातून 300 आपदा मित्रांच्या प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.  त्यापैकी पहिल्या 50 जणांच्या तुकडीचे 12 दिवसांच्या प्रशिक्षण वर्गास काल दि.23 डिसेंबर 2022 रोजी महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह चवदार तळे येथे सुरु झाले. याचे उद्घाटन महाड प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांच्या हस्ते संपन्न झाले.  

        यावेळी महाड तहसिलदार सुरेश काशिद, नायब तहसिदार काशिनाथ तिरमिळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक शशिकांत शिरसाट, काशिनाथ कुरकूटे, समाधान कडू, गणेश पाटील यांची उपस्थिती होती. 

      रायगड जिल्ह्यात नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तींमध्ये होत असलेली वाढ पाहता अशा प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपदा मित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचे, आपत्तीकाळात व आपत्तीनंतरच्या काळात करावयाच्या उपाययोजना व मदतकार्याविषयीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वय वर्षे 18 ते 40 असलेल्या या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यासाठी हे तब्बल 12 दिवसांचे निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणार्थींना लाईफ जॅकेट, बॅटरी, दोरखंड तसेच आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मदतकार्यासाठी आवश्यक असणाऱ्या इतर वस्तूंचे एकत्रित किट देण्यात आले आहे.  

       आपदा मित्रांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार असून त्यांचा रक्कम रू.5 लाखाचा अपघाती विमा उतरविण्यात येणार आहे.