मराठा आरक्षणासाठी अनवाणी पायी दिंडी

 मराठा आरक्षणासाठी  अनवाणी पायी दिंडी


नवीन पनवेल : मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असल्याकारणाने राज्य शासनाने मेगा भरती त्वरित थांबवावी तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी दत्ताभाऊ पाटील (वय ३१) या तरुणाने नांदेड ते मुंबई अनवाणी पायी दिंडी काढली आहे. ११ डिसेंबर रोजी पाटील पनवेलमध्ये आले. 

          नांदेड जिल्ह्यातील हादगावपासून १६ नोव्हेंबरला दत्ताभाऊ पाटील याने पायी प्रवास सुरू केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर या पायी प्रवासाची सांगता होणार आहे. साधारणतः रोज २५ ते ३० किलोमीटर प्रवास करून रात्री मिळेल तिथे मुक्काम करणाऱ्या या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आगळेवेगळे आंदोलन सुरू केले आहे. दत्ताभाऊ पाटील हा ११ डिसेंबर रोजी पनवेलमध्ये आला असता त्याचे स्वागत करण्यात आले
         मराठा आरक्षण हे उच्च न्यायालयाने वैध ठरवले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने मराठा आरक्षणाची बाजू व्यवस्थित मांडली नसल्याने हे आरक्षण नाकारले असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात राज्य शासनाने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. दरम्यान, राज्य शासनाने विविध क्षेत्रातील ७५ हजार रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू केली असून हा अन्याय असल्याचे दत्ताभाऊ पाटील यांनी सांगितले.