सिडकोकडून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सेवा शुल्काची आकारणी बंद, पायाभूत सुविधांचे हस्तांतरण केल्याच्या पार्श्वभूमीवर घेतला महत्वपूर्ण निर्णय
पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर, मा. श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार सिडको महामंडळातर्फे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सेवा शुल्काची आकारणी दिनांक 1 नोव्हेंबर 2022 पासून बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठा सेवादेखील टप्प्याटप्प्याने पनवेल महानगरपालिकेकडे सोपवण्यात येणार आहे.
“सिडकोने सुसज्ज पायाभूत सुविधांसह विकसित केलेले नवीन पनवेल, काळुंद्रे, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे व खारघर नोड पनवेल महानगरपालिकेस हस्तांतरीत केले आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 01 नोव्हेंबर 2022 पासून सिडकोने या क्षेत्रात सेवा शुल्क आकारणे बंद केले आहे. सदर तारखेपासून वरिल नोडच्या विकास आणि देखभालीची संपूर्ण जबाबदारी ही पनवेल महानगरपालिकेची असणार आहे”.
डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
सिडकोतर्फे नवी मुंबई क्षेत्रात नवीन पनवेल, काळुंद्रे, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे व खारघर नोड पायाभूत सुविधांसह विकसित करण्यात आले आहेत. तद्नंतर पनवेल महानगरपालिकेच्या निर्मितीनंतर सदर नोड व तेथील पायाभूत सुविधा पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सिडकोकडून सुरू करण्यात आली.
या नोडमधील घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, पावसाळी गटारे, पदपथ, मलनि:सारण वाहिन्या व विद्युत सेवा या पायाभूत सुविधा पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला असून त्यासंदर्भातील करारनामा निष्पादित होणार आहे. सदर नोडमधून सेवा शुल्क आकारण्याकरिता 31 ऑक्टोबर 2022 या अंतिम तारखेपर्यंतची देयके सिडकोतर्फे निर्मिण्यात आली आहेत. त्यानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2022 पासून सिडकोकडून उपरोक्त नोडमध्ये सेवा शुल्काची आकारणी बंद करण्यात आली आहे.