अखेर शिक्षकांचा आमदार शिक्षक झाला
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप
महायुतीच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय
शेकापच्या बाळाराम पाटलांचा दारुण
पराभव
पनवेल
(हरेश साठे) विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप,
शिवसेना, रिपाइं, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकाप आघाडीचे बाळाराम पाटील यांचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे शेकापसह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
या निवडणुकीत ९१. २ टक्के मतदान झाले होते. मतदान झालेल्या एकूण ३५हजार ६९ मतांपैकी ३३ हजार ४५० मते वैध, तर १६१९ मते अवैध ठरली. मतमोजणीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्या पसंतीची तब्बल २० हजार ६८३ मते मिळवून दणदणीत विजय मिळविला तर पराभूत शेकापच्या बाळाराम पाटील यांना केवळ १० हजार ९९७ मतांवर समाधान मानावे लागले.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हात्रे यांनी, हा विजय माझा एकट्याचा नसून मतदारसंघातील संपूर्ण शिक्षकांचा आहे. गेल्या सहा वर्षांत मी जे काम केले त्याची पोचपावती आज कोकण विभागातील शिक्षकांनी दिली आहे. ३३ संघटनांचा आम्हाला पाठिंबा होता तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री तसेच या मतदार संघातील आमदार आणि शिक्षक सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. त्यांचा विश्वास सार्थ ठरवून शिक्षकांसाठी सातत्याने काम करीत राहणार असल्याची ग्वाही, म्हात्रे सर यांनी दिली. दरम्यान, या विजयाबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कोट-शिक्षकांनी आपल्यापैकी एक असलेल्या शिक्षकालाच विजयी केले. अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे हा विजय सोपा झाला. नामदार रविंद्र चव्हाण
कोट- शेकापचे बाळाराम पाटील ज्या शिक्षकांच्या पाठिंब्यावर निवडून आले त्या शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू शकले नाहीत, त्यामुळे त्यांचा पराभव झाला तर शिक्षकांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे सर हे मुळातच शिक्षक असल्याने ते निवडून आले पाहिजे हि भावना शिक्षकांची होती. आणि त्याचा परिपाक म्हणून ३५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच पहिल्या फेरीत भरघोस मतांनी निवडून आले आहेत. मी तत्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो- आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष- भाजप-रायगड जिल्हा