बेकायदा दारूची विक्री करण्याऱ्या विरोधात उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके कारवाईसाठी झाली सज्ज

बेकायदा दारूची विक्री करण्याऱ्या विरोधात  उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके कारवाईसाठी झाली सज्ज 


पनवेल दि. २७ (वार्ताहर ) : सरत्या वर्षाला निरोप तसेच वर्षा स्वागतासाठी पनवेल तालुक्यातील हॉटेल्स, परमीटरूम, बिअरबार, ढाबे ,डान्स बार सज्ज  झाले आहेत. याकाळात अवैधरित्या पार्टी तरीच बेकायदा दारूची विक्री मोठया प्रमाणात होत असल्याने उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके कारवाईसाठी सज्ज झाली आहेत. 

               नाताळ आणि नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर दारूची दुकाने आणि बार पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य गृह विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बारचालक आणि तळीराम सुखावले आहेत.  पनवेल तालुक्यात मद्य विक्रीचा रीतसर परवाना असलेली मोठ्या प्रमाणात आस्थापना आहेत,तसेच जिल्ह्यात पनवेल हे मद्याविक्रीचे प्रमुख केंद्र आहे. तालुक्याच्या हदीतील महामार्गालगत असलेले बार आणि ढाबे ग्राहकांनी नेहमीच गजबलेले असतात. मुंबई, पुणे परिसरातून अनेकांची ऊठबस करण्यासाठी ढाब्यांवर जय्यत तयारी केली जाते. त्यामुळे नववर्ष स्वागताच्या निमित्ताने बेकायदा पार्टीवर कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पार्टीचे आयोजन करण्यासाठी एक दिवसाचा परवाना घेणे उत्पादन शुल्क विभागाने बंधनकारक केले आहे. तसेच परवानाधारक दुकानांमधूनच दारू घेण्याचे आवाहन केले आहे. परवानगी नसलेल्या ठिकाणी दारू पिण्यासाठी बसू नये, तसे निदर्शनास आल्यावर दारू विक्री करणाऱ्यावर आणि मद्यपीवर कारवाई केली जाणार आहे. पनवेल शहर व ग्रामीण भाग व परिसर या विभागासाठी पथक नेमले आहे. त्यामुळे बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर करडी नजर असणार आहे.

कोट - 

नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने बेकायदा मद्यविक्री आणि पार्टीचे आयोजन करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाणार आहे. यासाठी उत्पादन शुल्क विभागाने सात पथके आहेत.रविकिरण कोले जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी.