अनंत चतुर्दशी दिनी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सुव्यवस्थित नियोजन


                                      अनंत चतुर्दशी दिनी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सुव्यवस्थित नियोजन



 

      नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील श्रीगणेशोत्सव 7 सप्टेंबर पासून अत्यंत उत्साहात संपन्न होत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महिनाभरापूर्वींच गणेशोत्सवासंबधी आढावा बैठकीप्रसंगी ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्यातबाबत नागरिकांना केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद लाभलेला दिसून आला.

पीओपी ऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यास अनेक नागरिकांनी पसंती दर्शविली. शाडूच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करणा-या गणेशभक्तांना स्वच्छता व पर्यावरणमित्र म्हणून महानगरपालिकेमार्फत प्रशस्तीपत्र देऊन सर्व विसर्जनस्थळी सन्मानित करण्यात आले.

नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण व्हावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात 137 इतक्या मोठया संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जनास मोठया प्रमाणावर पसंती दर्शविली.

नवी मुंबई महानगरपालिकेने 22 नैसर्गिक व 137 कृत्रिम अशा 159 विसर्जन स्थळांवर केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमुळे श्रीगणेशोत्सवातील दीड दिवस, पाच दिवस, गौरीसह सहा दिवस व सात दिवस अशा चारही विसर्जन दिवशी श्रीमूर्ती विसर्जन अत्यंत सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले. या चार विसर्जन दिवशी 35720 श्रीमूर्तीना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवांच्या आकाराने मोठ्या मूर्तींचे विसर्जन होणार असल्याने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील सर्व विसर्जन स्थळांवर अधिक सक्षम व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये सर्व 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात स्वयंसेवक व लाईफगार्ड्स कार्यरत असणार आहेतत्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यतत्पर राहणार आहेत. पोलीस यंत्रणेचेही सर्व विसर्जन स्थळांवरील कायदा व सुव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष असणार आहेसर्व 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सी.सी.टी.व्ही. लावण्यात आले असून पोलीस विभागाचे याव्दारे गर्दीवर बारीक लक्ष असणार आहे.

      श्रीमूर्ती विसर्जनाकरिता विसर्जनस्थळी मध्यम व मोठ्या तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी येतात अशा विसर्जन स्थळांवर फोर्कलिफ्ट / क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. कोपरखैरणे से-19 येथील धारण तलावावर अत्याधुनिक यांत्रिकी तराफ्याची व्यवस्था करण्यात आली असून आकाराने मोठया श्रीमूर्ती विसर्जनासाठी या यांत्रिकी तराफ्याचा श्रम व वेळ वाचण्यात मोठया प्रमाणात उपयोग होणार आहे.

विसर्जन स्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबूचे बॅरेकेटींग करण्यात आले असून विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भक्तजनांना व्यवस्थितरित्या श्रीमूर्तींची निरोपाची आरती व पूजा करता यावी यादृष्टीने विसर्जनस्थळी रांगेत टेबलची मांडणी करण्यात आली आहे. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जन स्थळांवर सूचना व स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठामुळे भाविकांची गर्दी मोठी असूनही त्यांना आवश्यक सूचना देणे व गर्दीचे नियोजन करणे शक्य होत आहे

     नागरिकांमार्फत श्रीमूर्तींसोबत विसर्जन स्थळी आणले जाणारे पुष्पमाळाफुलेदुर्वाशमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ओले निर्माल्य” त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे तसेच मूर्तीच्या गळ्यातील कंठीसजावटीचे सामान असे सुके निर्माल्य” स्वतंत्र कलशात टाकावे, आणि कोणत्याही परिस्थितीत या वस्तू पाण्यात टाकू नयेत अशाप्रकारे महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली असून हे निर्माल्य महानगरपालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेले जात आहे व त्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे श्रीमूर्तींसोबत आणली जाणारी फळे व खाद्यवस्तू गरजू मुलांना आणि नागरिकांना वितरण करण्यात येत आहेत.

      वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीगणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन महानगरपालिका व पोलीस यांच्यामार्फत सुयोग्य व्यवस्था करण्यात आली असून त्या ठिकाणी उभारण्यात येणा-या मोठ्या मंचावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 

नागरिकांकडून मिळणा-या उत्तम सहयोगामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवातील आत्तापर्यंतचे श्रीमूर्ती विसर्जन चांगल्या रितीने पार पडले असून अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणारा विसर्जन सोहळाही निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.