पर्यावरणपूरक गणोशोत्सवाला पनवेलकरांचा सकारात्मक प्रतिसाद; शाडू मातीच्या मुर्तीना व कृत्रिम तलावाला नागरिकांनी दिली पसंती


पर्यावरणपूरक गणोशोत्सवाला पनवेलकरांचा सकारात्मक प्रतिसाद;

शाडू मातीच्या मुर्तीना व कृत्रिम तलावाला नागरिकांनी दिली पसंती



पनवेल,दि.23: पनवेल महापालिका क्षेत्रात नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पनवेल महानगरपालिकेने केले होते, या आवाहनाला पनवेकरांचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त पनवेलसाठी पनवेल महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. या अंतर्गतच सणांचं पावित्र्य आणि पर्यावरणाचं भान राखलं जावं यासाठी आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ ही मोहिम हाती घेतली होती. यासाठी महापालिकेने विशेष अशी सप्तसूत्री देखील बनविली होती. या सप्तसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले होते. यासाठी महापालिकेने विशेष जय्यत तयारी केली होती.  याकामी विविध एनजीओ, सेवाभावी संस्थांचे महापालिकेला सहकार्य मिळाले.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यत गणशोत्सव हा सर्वांचा आवडता सण आहे. महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कोमोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात  घरगुती व 250 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे भाक्तिमय  वातावरणात नियोजनबध्दरित्या  शांततेत दीड दिवसाचे, पाच दिवसाचे , सहा दिवसाचे, सात दिवसाचे, दहा दिवसाचे गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावर्षी शाडू मातीच्या मुर्तींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. याबरोबरच कृत्रिम तलावालाही नागरिकांनी मोठी पसंती दिली. यावर्षी शाडू मातीच्या गणेश मुर्तींचे पनवेलमध्ये दीड दिवसाचे ,पाच दिवसाचे , सहा दिवसाचे व दहा दिवसाचे असे एकूण नैसर्गिक तलावामध्ये 4 हजार 471 , तर कृत्रिम तलावामध्ये 2 हजार 389 गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करणाऱ्या नागरिकांना विशेष प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

चौकट

निर्माल्य रथ यावर्षी महापालिकेच्यावतीने निर्माल्य रथाची अभिनव संकल्पना महापालिकेन राबविली. यामध्ये दहा दिवस सार्वजनिक गणेश मंडळे व विसर्जन ठिकाणचे एकुण 20 टन निर्माल्य गोळा झाले. यामध्ये 6 टन निर्माल्यापासून धूपकांडी व अगरबत्ती बनविण्यात येणार आहे. तसेच  4.5 टन निर्माल्यापासून नानासाहेब प्रतिष्ठान यांच्यावतीने सेंद्रिय खत बनविण्यासाठी येणार आहे.याबरोबरच पालिकेच्यावतीने 9.5 टन निर्माल्याचे सेंद्रिय खत बनविण्यात येणार आहे.

चौकट

‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ ही मोहिमेंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबविण्यास महापालिकेस चारही प्रभागामध्ये यावर्षी विविध एनजीओ, सामाजिक संस्थानी देखील बहुमोल सहकार्य झाले. यामध्ये पर्यावरण दक्षता मंच , रोटरी क्लब ,लायन्स क्लब, भारत विकास परिषद, निसर्ग मित्र संस्था, सिटीझन्स युनिटी फोरम, , रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, आर्या फूडस्, अल्ट्रास्टिक फाऊंडेशन, रोडपाली रेसिडन्स् वेलफेअर असोशिएशन, मराठी ब्राम्हण समाज, नॅचरल हेल्थ ड्रग फाऊंडेशन, रॉबिन हूड आर्मी वेलफेअर, संघर्ष समिती महिला संस्था, खारघर तळोजा कॉलनी वेलफेर,पोलिस विभाग याबरोबर व्यक्तीगत पातळीवर देखील नागरिकांनी सहकार्य केले. याबरोबर माजी नगरसेवकांनी देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सहकार्य केले.