पनवेल महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्मिता काळे यांनी खारघरमध्ये नवरात्री मंडळे तसेच नागरिकांची संवाद बैठक घेतली


पनवेल महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्मिता काळे यांनी खारघरमध्ये नवरात्री मंडळे तसेच नागरिकांची  संवाद बैठक घेतली


पनवेल,दि.3 : खारघर प्रभाग ‘अ’ मध्ये आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी  दिलेल्या निर्देशानुसार सहायक आयुक्त स्मिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली खारघरमधील नवरात्र उत्सव मंडळ सदस्य,जेष्ठ नागरिक,नागरिक यांची दिनांक 1 ऑक्टोबर रोजी प्रभाग कार्यालयात ‘संवाद बैठक’ घेण्यात आली.

        या बैठकिस प्रभारी अधिक्षक जितेंद्र मढवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक खारघर पोलीस ठाणे, खारघर वाहतूक शाखा पोलीस कर्मचारी, महापालिका बांधकाम विभाग अभियंता, पाणीपुरवठा विभाग अभियंता, तसेच उद्यान विभाग पर्यवेक्षक व इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते. 

        प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्यादृष्टीने आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी ‘ संवाद बैठक’ आयोजित करण्याबाबत प्रभाग अधिकाऱ्यांना सूचित केले होते. तसेच नवरात्र उत्सव मंडळांना सूचना देण्याबाबत आयुक्तांनी सूचित केले होते. त्यानूसार या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.

     या बैठकिमध्ये उपस्थित नवरात्र उत्सव मंडळ सदस्यांना नवरात्री उत्सवादरम्यान सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याविषयीच्या सूचना देण्यात आल्या.तसेच पर्यावरणपूरक नवरात्र उत्सव साजरा करण्याबाबत सूचित करण्यात आले. याबरोबरच प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळणे,जनजागृती बाबतचे देखावे करणे नवरात्री दरम्यान तयार होणारे निर्माल्य हे निर्माल्य कलशामध्ये टाकण्याबाबत सूचना देण्यात आल्या. 

        तसेच  खारघर पोलीस ठाणे यांच्याकडून नवरात्र उत्सव ठिकाणी रस्त्यावर वाहने उभी करू नयेत. तसेच ध्वनीक्षेपकांचे आवाज मर्यादित ठेवणे,  रहदारीच्या रस्त्यांवरती गर्दी होणार नाही याबाबत काळजी घेण्याविषयी नवरात्र उत्सव मंडळांना सूचित केले.

याबरोबरच नवरात्र मंडळांनी विसर्जन रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पथदिव्यांची दुरुस्ती , विसर्जन घाट परिसरात सिसीटिव्ही कॅमेरा सुविधा उपलब्ध करणे, व्हॅाटसअप ग्रुप तयार करून शासनाची नियमावली प्रसारित करणे, विसर्जन झाल्यानंतर तलाव ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याबाबत महापालिकेस विनंती केली. या मागण्या पूर्ण करण्याच्यादृष्टीने सहायक आयुक्तांनी महापालिकेच्या अधिकारीवर्गास सूचित केले. त्यानूसार कार्यवाहीस सुरूवात करण्यात आली आहे.तसेच जेष्ठ नागरिक व नागरिकांच्या इतर तक्रारीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.