एक हजार पोस्टकार्डांवर भारती विद्यापीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी दिला मतदान करण्याचा संदेश


एक हजार पोस्टकार्डांवर भारती विद्यापीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी दिला मतदान करण्याचा संदेश



नवी मुंबई (प्रतिनिधी) - विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान वाढीसाठी विधानसभा निवडणूक कार्यालय व महानगरपालिका यांच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न सुरू असून यामध्ये विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
          असाच एक अभिनव उपक्रम भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, नवी मुंबई शाळेच्या विद्यार्थ्यांनी राबविला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना एक हजाराहून अधिक पत्रांतून मतदान करण्याविषयी आवाहन केले. हा अनोख्या पध्दतीने व्यापक स्वरूपात राबवण्यात आलेला मतदान जनजागृतीचा उपक्रम शाळेतील कलाशिक्षक श्री. नरेश लोहार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.  या विद्यार्थ्यांनी पत्रांतून आपल्या आई-वडिलांना व नातेवाईकांना - बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून माझ्या व भारताच्या उज्वल भविष्यासाठी आपण जरूर मतदान करावे आणि भारताची लोकशाही बळकट करावी ही विनंती, माझेही वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मीही मतदान करेन असे लिहिले आहे. तसेच मतदानादिवशी लागणारी ओळखपत्रे म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदार ओळखपत्र, बँक पासबुक, भारतीय पासपोर्ट, यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत जरूर असावे असाही संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना व नातेवाईकांना पत्राद्वारे दिलेला आहे.
          उल्लेखनीय बाब म्हणजे काही विद्यार्थ्यांनी मतदार आणि लोकशाही यावर  विधानसभा मतदानासंदर्भात लग्नपत्रिका तयार करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने मतदान जनजागृती केली आहे.
         याप्रसंगी उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त श्री. श्रीकांत तोडकर, सहायक आयुक्त डॉ.अमोल पालवे, स्वच्छ्ता अधिकारी श्री सूर्यकांत म्हात्रे तसेच  प्राचार्य श्री. बेल्लम आर टी व इतर शिक्षक उपस्थित होते.