पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांचे 2डिसेंबरपासून होणार सर्वेक्षण


पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांचे 2डिसेंबरपासून होणार सर्वेक्षण


पनवेल ,दि.29 : दिव्यांग बांधवांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांगाची सर्व माहिती गोळा करण्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांचे दिनांक 2 डिसेंबर 2024 पासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी केले आहे.

नागरिकांना उत्कृष्ट सेवा आणि सुविधा प्रदान करण्यासाठी पनवेल महानगरपालिका कायमच तत्पर असते. त्याचाच एक विशेष भाग म्हणून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम पनवेल महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. दिनांक 2 डिसेंबर 2024 पासून पनवेल मनपा क्षेत्रात दिव्यांग बांधवांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात होणार आहे.  या सर्वेक्षणामध्ये पनवेल क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींची संख्या, त्यांचे प्रकार आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या सेवांची माहिती गोळा केली जाईल. 

 केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पनवेल महानगरपालिका यांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींना विविध सेवा, सुविधा व योजना उपलब्ध करून देण्यात येत असतात, या सर्वेक्षणादरम्यान याची  माहिती  देखील दिव्यांग बांधवांना देण्यात येणार आहे.

मनपा क्षेत्रातील बऱ्याचशा दिव्यांगाची नोंद पालिकेकडे नाही, त्यामुळे सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी घरातील दिव्यांग व्यक्तींची व्यवस्थित पूर्णतः माहिती देऊन आवश्यक ते सहकार्य करावे,असे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.