शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना वंचित'चा पाठिंबा
पनवेल : पनवेल विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. 'वंचित'च्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पत्र प्रसिद्ध करून वंचित'च्या पनवेल पदाधिकाऱ्यांना बाळाराम पाटील यांच्या पाठिशी ताकद उभी करण्याचे आदेश दिले आहेत.
नैना, महापालिका क्षेत्रात अपुरे पाणी, महापालिकेच्या दर्जाहीन पायाभूत सोयीसुविधा आणि मालमत्ता करामुळे नाराज असलेले अडीच लाख मालमत्ताधारक यामुळे यंदा निवडणुकीची रंगत वाढली आहे. अनेक संस्था, संघटनांचा पाठिंबा मिळत असताना बाळाराम पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्यामुळे शेकापला याचा फायदा होईल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बाळाराम दत्तात्रेय पाटील यांना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी पाठिंब्याचे पत्र बाळाराम पाटील यांना शुक्रवारी दिले. थेट वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यामुळे बाळाराम पाटील यांच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा झाल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.