22 डिसेंबरला स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार नवी मुंबई;पामबीच रस्त्याची एक बाजू पहाटेपासून सकाळी 9 पर्यंत राहणार बंद

 22 डिसेंबरला स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार नवी मुंबई;पामबीच रस्त्याची एक बाजू पहाटेपासून सकाळी 9 पर्यंत राहणार बंद


 

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात देशात व्दितीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त करणा-या नवी मुंबई शहरात स्वच्छता ही कायमस्वरूपी करण्याची बाब असल्याने रविवार दि. 22 डिसेंबर 2024 रोजी संपन्न होणा-या स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये उत्साहाने नावनोंदणी करीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला.

रविवारी सकाळी 5.30 वा. हाफ मॅरेथॉनला 21 किमी. अंतराच्या गटापासून प्रारंभ होत असून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून सानपाडा मोराज सर्कलपर्यंत जाऊन तेथून यू टर्न घेऊन पुन्हा मुख्यालयापर्यंत धावपटूंनी यायचे आहे.

त्याचप्रमाणे सकाळी 6.15 वा. सुरू होणा-या 10 किमी. अंतराच्या हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटूंनी मुख्यालयापासून वजिरानी सिग्नलपर्यंत धावत जाऊन त्या ठिकाणाहून यू टर्न घेऊन परत मुख्यालयापर्यंत यायचे आहे.

याशिवाय 7 वा. सुरू होणा-या 5 किमी. अंतराच्या गटासाठी मुख्यालयापासून सुरूवात केल्यानंतर नागरिकांनी अक्षर सिग्नलपासून यू टर्न घेऊन मुख्यालयापर्यंत परतायचे आहे.

पाम बीच मार्गवर होणा-या या हाफ मॅरेथॉनकरिता नमुंमपा मुख्यालयासमोरील पामबीच रस्ता एनआरआय सिग्नलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे व त्यापुढे सानपाडा मोराज सर्कलपर्यंतचा पामबीच रस्ता पूर्वेकडे म्हणजे खाडीच्या बाजूने वाहतुकीसाठी पहाटेपासून बंद असणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे.

या हाफ मॅरेथॉनमध्ये दिव्यांग नागरिक, महानगरपालिकेच्या इटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी तसेच नमुंमपा शाळा व खाजगी शाळांतील विद्यार्थी साधारणत: 1 ते 3 किमी. अंतर सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे तृतीयपंथी नागरिकही शहर स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी धावणार आहेत.     

स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन सुनियोजित रितीने संपन्न व्हावी याकरिता सर्व तयारी करण्यात आली असून रस्त्यात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेले काऊंटर, मोबाईल स्वच्छतागृहे, प्राथमिक आरोग्य सेवा, रूग्णवाहिका, अल्पोपहार अशा सुविधांची पूर्तता करण्यात येत आहे.   

स्वच्छता आणि आरोग्य या दोन्ही महत्वाच्या बाबींचा प्रचार व प्रसार करणारी ही स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन नवी मुंबईकरांच्या उत्साही सहभागातून नियोजनबध्द रितीने आयोजित करण्यात आली असून या माध्यमातून नवी मुंबईची स्वच्छ शहर संकल्पना अधिक दृढ होत आहे.