सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 23 डिसेंबर 2024 ते 03 जानेवारी 2025 या कालावधीत “सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम” नमुंमपाच्या अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही मोहीम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात आली आहे. यामध्ये सर्व 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये 80 पथकांच्या माध्यमातून 36826 घरांमध्ये 1,56,597 रहिवाशांना भेटी देण्यात आल्या.
या मोहीमेच्या निमित्ताने आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृतीपर उपक्रम राबवून तसेच नागरिकांना हस्तपत्रके वितरीत करुन क्षयरोगविषयी जनजागृती निर्माण करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने क्षयरोग कसा पसरतो तसेच त्यांची लक्षणे, जसे की - दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप यणे, भूक मंदावणे, वजनात लक्षणीय घट, छातीत दुखणे, मानेवर गाठ अशी लक्षणे असल्यास लवकरात लवकर जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करण्यास आणि निदान झाल्यास संपूर्ण उपचार घेण्यास नमुंमपामार्फत आवाहन करण्यात आले.
सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीमे दरम्यान एकूण 1512 संशयित क्षयरुग्ण शोधण्यात आले व NAAT आणि X-ray तपासणीव्दारे 39 क्षयरुग्णाचे निदान करण्यात आले. सर्व क्षयरुग्णांना ना.प्रा.आ.केंद्रामार्फत त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या मोहिमेच्या माध्यमातून क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्यापही उपचारापासून वंचित असणाऱ्या जास्तीत जास्त क्षयरुग्णांचा प्रशिक्षित पथकाव्दारे शोध घेऊन त्यांच्यावर क्षयरोग औषधोपचार सुरु करण्यात आले. या मोहीमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.