पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मं
पत्रकार दिनानिमित्त वृत्त निवेदिका तृप्ती पालकर यांचा सन्मान
पनवेल (प्रतिनिधी) पत्रकार दिनानिमित् त पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्यावतीने मराठी वृत्तपत्र क्षेत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबरीने या दिनाचे औचित्य साधून एनडीटीव्ही मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्त निवेदिका तृप्ती पालकर यांचा सत्कार करण्यात आला.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८८२ मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ मध्ये कोकणातील पोंभुर्ले या गावात एका सामान्य कुटुंबात झाला होता.जांभेकर यांचे जीवनमान अवघ्या ३४ वर्षांचे होते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी दर्पणच्या संपादकपदाची मोठी जबाबदारी पेलली. बाळशास्त्री जांभेकर यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या विचारांचा ठेवा आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या तब्बल १० भाषांचे ज्ञान बाळशास्त्री जांभेकरांना होते. या भाषांसोबतच, विज्ञान, भूगोल, गणित आणि सामान्य ज्ञान या विषयांचे त्यांना खोलवर ज्ञान होते. जांभेकरांनी समाजातील वर्णव्यवस्था, स्त्री दास्य, अस्पृश्यता, बालविवाह, जातीभेद इत्यादी गोष्टींवर त्यांनी आवाज उठवला, वृत्तपत्रांतून लिखाण केले. त्यामुळे, त्यांना आद्य संपादक उपाधी मिळाली. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले. त्यामुळे त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह देशात दरवर्षी पत्रकार दिन विविध समाजोपयोगी कार्यक्रमे राबवून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने पनवेल तालुका पत्रकार विकास मंच्यच्यावतीनेही विविध उपक्रमे राबवित सामाजिक बांधिलकी जपली जाते. त्याप्रमाणे पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच प्रसिद्ध वृत्त निवेदिका आणि मंचाच्या सदस्या तृप्ती पालकर यांचा मंचाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील व डॉ. संजय सोनावणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मंचाचे खजिनदार संजय कदम, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस हरेश साठे,सदस्य प्रवीण मोहोकर, दीपक घोसाळकर, राजू गाडे, दत्तात्रेय कुलकर्णी यांच्यासह सदस्यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी मंचाचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना 'श्री साईबाबा दैनंदिनी २०२५' भेट दिली.