'कोल्ड प्ले काॅन्सर्ट' हा 'शून्य कचरा कार्यक्रम' स्वरूपात साजरा होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नेरूळ येथील डॉ. डी वाय पाटील स्टेडियम मध्ये 'कोल्ड प्ले' हा जागतिक दर्जाचा संगीतमय काॅन्सर्ट दि. 18, 19 व 21 जानेवारी 2025 रोजी संपन्न होत असून याचा अनुभव घेण्यासाठी देशभरातून तसेच जगभरातूनही असंख्य संगीत रसिक नवी मुंबईत येणार आहेत.
या तीन दिवसात मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने नवी मुंबई शहरातील स्वच्छता अबाधित राहावी व नागरिकांना अस्वच्छतेमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नेहमीच अग्रभागी असणारे नवी मुंबई शहर स्वच्छतेच्या उद्दिष्टांप्रती आपली बांधिलकी प्रदर्शित करीत या काॅन्सर्टच्या अनुषंगाने स्वच्छतेवर विशेष लक्ष देत आहे.
'कोल्ड प्ले' हा संगीतमय कार्यक्रम पर्यावरणपूरक 'शून्य कचरा कार्यक्रम (Zero Waste Event)' म्हणून आयोजित करण्याची नामी संधी उपलब्ध असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मानक कार्यप्रणालीचे अनुकरण करीत हा उपक्रम घनकचरा व्यवस्थापनास पूरक व पर्यावरण स्नेही करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक पावले उचलली आहेत. तशाप्रकारे आयोजकांना सूचना देऊन कार्यवाही केली जात आहे.
याकरिता कचरा निर्मितीच्या ठिकाणी म्हणजे कार्यक्रम स्थळी कचऱ्याचे जागीच वर्गीकरण आणि त्या ठिकाणचा कचरा संकलन करण्यासाठी पुरेशा कचरा डब्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तेथील कचरा वर्गीकरणाकरिता स्त्रीमुक्ती संघटनेच्या सहयोगाने 150 परिसर सखी दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत कार्यक्रम स्थळी कार्यरत असणार आहेत. या संकलित कचऱ्यातील प्लास्टिक बाटल्या पुनर्प्रक्रियेसाठी नेल्या जाणार आहेत तसेच ओला कचरा नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेला जाणार आहे. याकरिता 10 रिफ्युज कॉन्टॅक्टर कार्यरत असणार असून कार्यक्रमांच्या दिवसात त्यांच्या 182 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने 12 जानेवारीपासून नेरूळ परिसरातील डीप क्लीनिंग मोहिमेला सुरुवात केली असून या अंतर्गत रस्ते, पदपथ, दुभाजक याठिकाणी जमा झालेली माती तसेच रेती उचलून घेण्यात आलेली आहे. रस्ते व पदपथ धुवून घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यांवरील मार्गदर्शिका फलक व शिल्पाकृती देखील धुवून घेण्यात आलेल्या आहेत. ते धुण्यासाठी प्रकर्षाने मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत पाणी वापरण्यात आलेले आहे. या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची बचतही करण्यात आली आहे.
'कोल्ड प्ले काॅन्सर्ट' पार पडल्यानंतर त्या परिसरातील व नेरूळ विभागातील स्वच्छतेवर विशेष बारकाईने लक्ष देण्याचे नियोजन करण्यात आले असून त्या ठिकाणी कार्यक्रमांच्या तिन्ही दिवशी स्वच्छतेची विशेष मोहीम रात्री 11 ते पहाटे 4 या वेळेत राबवली जाणार आहे. अशाच प्रकारची स्वच्छतेबाबत जागरूकता पार्किंग क्षेत्रातही ठेवण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेच्या दृष्टीने या इव्हेंटकडे अतिशय काटेकोरपणे बघत असून जगभरातील लोकांसमोर स्वच्छ नवी मुंबई शहराची प्रतिमा वृद्धिंगत व्हावी यादृष्टीने जनजागृतीपर होर्डिंग, बॅनर, डिजिटल बॅनर याद्वारे कार्यक्रम स्थळी व परिसरात स्वच्छतेची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जात आहे.
त्यासोबतच आरोग्याविषयी दक्षता घेत कार्यक्रम स्थळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दोन रुग्णवाहिका व पुरेसा मेडिकल स्टाफ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रम स्थळापासून जवळच असलेल्या महानगरपालिकेच्या नेरूळ रुग्णालयात दहा बेड राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
स्वच्छ व सुंदर शहर ही नवी मुंबईची ओळख असून कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या माध्यमातून संपूर्ण जगभरातील संगीत रसिक नवी मुंबई शहराला भेट देत असताना शहराची प्रतिमा उंचावण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने हा इव्हेंट 'झिरो वेस्ट इव्हेंट अर्थात शून्य कचरा उपक्रम' करण्यावर भर दिला आहे. यामध्ये कार्यक्रमाला येणाऱ्या विविध देशांतील व राज्याच्या विविध शहरांतील नागरिकांनी नवी मुंबई शहर स्वच्छतेला बाधा पोहोचेल अशा प्रकारे अस्वच्छता होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.