शुक्रवारपासून पनवेलमध्ये राज्यस्तरीय 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी

शुक्रवारपासून पनवेलमध्ये राज्यस्तरीय 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी


राज्यातून निवडलेल्या २५ उत्कृष्ट एकांकिका होणार सादर 


पनवेल (प्रतिनिधी)  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या ११ व्या स्पर्धेची महाअंतिम फेरी १०, ११ आणि १२ जानेवारी रोजी पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा 'अटल करंडक' देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार तसेच ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा "गौरव रंगभूमीचा" पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असून प्राथिमक फेरीतून निवड झालेल्या उत्कृष्ट २५ एकांकिका या तीन दिवसांच्या महाअंतिम फेरीत सादर होणार आहेत. 
          या महाअंतिम फेरीचे उदघाटन शुक्रवार दिनांक १० जानेवारीला सकाळी ०९ वाजता होणार आहे. या समारंभास श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर यांची प्रमुख मान्यवर म्हणून तर सुप्रसिद्ध नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, प्राथमिक फेरीचे परीक्षक मानसी मराठे व आशीर्वाद मराठे यांची आदरणीय उपस्थिती असणार आहे. 
         पारितोषिक वितरण सोहळा रविवार दिनांक १२ जानेवारीला सायंकाळी ०७ वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी सन्मानमूर्ती ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची सन्माननीय तर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने, सुप्रसिद्ध दिग्दर्शक देवेंद्र पेम, विराजस कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेता जयवंत वाडकर, सुप्रसिद्ध नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, अटल करंडक ब्रँड अँम्बेसिडर सुप्रसिद्ध अभिनेत्री रुचिरा जाधव, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले यांची आदरणीय उपस्थिती असणार आहे. या महाअंतिम फेरीच्या अनुषंगाने नाट्य एकांकिकांचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील आणि टीम अटल करंडक यांनी केले आहे.